वाढत्या व्यसनाधीनतेने चिंतेचे मळभ

योगेश पायघन
रविवार, 18 मार्च 2018

औरंगाबाद - मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू यांच्यासह अमली पदार्थांचे सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्यसनाधीनतेच्या विळख्यात तरुणाईसह स्त्रियाही अडकत आहेत. व्यसनाधीनतेमुळे दरवर्षी साडेअठरा हजार कोटी रुपयांची क्रयशक्ती खर्ची पडते. व्यसनाधीनतेला रोखायचे कसे, याची चिंता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आहे. 

औरंगाबाद - मद्यपान, धूम्रपान आणि तंबाखू यांच्यासह अमली पदार्थांचे सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्यसनाधीनतेच्या विळख्यात तरुणाईसह स्त्रियाही अडकत आहेत. व्यसनाधीनतेमुळे दरवर्षी साडेअठरा हजार कोटी रुपयांची क्रयशक्ती खर्ची पडते. व्यसनाधीनतेला रोखायचे कसे, याची चिंता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आहे. 

सिगारेट, सिगार, हुक्का आणि दारू यांचे विविध प्रकार बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय, अशा पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी असूनही कायद्यातील पळवाटा शोधून या ना त्या मार्गाने जाहिराती केल्या जातात. अनेक जण व्यसनांच्या आहारी गेल्याने आजारग्रस्त होत आहे, असे दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. साधारणपणे आज ५६ टक्के पुरुष मित्रांबरोबर; तर ४८ टक्के स्त्रिया घराबाहेर सिगारेटचा झुरका घेतात, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. व्यसनमुक्ती किंवा तंबाखूमुक्तीच्या माध्यमातून पंधरा वर्षांत पाच टक्के ग्रामीण; तर सहा टक्के शहरी लोकांनी व्यसन सोडल्याचा दावा आहे; मात्र हे प्रमाण वाढणाऱ्या व्यसनाच्या निम्मेदेखील नाही. त्यामुळे घरातून व्यसन सोडायला पाठबळ मिळणेच गरजेचे आहे, असे मानसोपचार समुपदेशक सांगतात.

शरीर होते कमजोर
व्यसनांमुळे तोंड, स्वादूपिंड, घसा, नपुंसकत्व, हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, फुफ्फुसाचे रोग (सीओपीडी), हृदयविकार, अर्धांगवायू, स्वरयंत्राचा रोग, दृष्टिदोष, दात-हिरड्यांचे आजार होतात. स्त्रियांमध्ये हाडांची घनता कमी होणे, संधिवात, मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, जखम भरण्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब, उदासीनता, अनियमित मासिक पाळी, लवकर रजोनिवृत्ती, गर्भधारणा न होणे, श्वासाचे विकार, वंध्यत्व, गर्भपात, अर्भकाच्या मेंदूवर परिणाम संभवणे असे विविध प्रकारचे आजार होतात.

थक्क करणारी आकडेवारी 
२० कोटी -  जगातील एक अब्ज  धूम्रपान करणाऱ्यांपैकी स्त्रिया
५० लाख - धूम्रपानाने दरवर्षी लोक मृत्युमुखी 
१० पट - सात वर्षांत मुलींमध्ये भांग व्यसनात वाढ
(स्रोत -  जागतिक आरोग्य  संघटनेचे २०१२ चे सर्वेक्षण)

Web Title: marathi news aurangabad news Addiction