एकाच ॲपवर चालते रेल्वे अन्‌ रिक्षाही

एकाच ॲपवर चालते रेल्वे अन्‌ रिक्षाही

औरंगाबाद - सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे सर्व गोष्टी डिजिटल होत आहेत. इंटरनेटमुळे प्रत्येक माहिती क्षणात उपलब्ध होण्याचा हा काळ आहे; मात्र याचा कुणाला किती फायदा करून घेता येतो हे महत्त्वाचे आहे. औरंगाबाद शहरातील रिक्षाचालकही हायटेक झाले आहेत. सध्या रेल्वे कुठे आहे याची माहिती मोबाईल ॲप्सवर मिळते. मग त्याच्याच सांगण्यानुसार रिक्षाचाही प्रवास सुरू असतो. अगदी दिवभर रेल्वेच्या लोकेशननुसारच शहरातील शेकडो रिक्षा धावत आहेत. 

इंटरनेटच्या काळात जग वेगवान झाले आणि जग जवळही आले. क्षणार्धात जगभरातील माहिती मिळणे आता अवघड राहिले नाही. रेल्वे, विमानसेवा, बससेवा अशा सर्वच सेवांचे जाळे इंटरनेटच्या माध्यमाने विणले गेले आहे. इंटरनेटमुळे कुठली रेल्वे कुठे आहे, हे पाहता येते. देशभरातील कुठल्याही रेल्वेचे लोकेशन सहज प्राप्त होते. यासाठी गुगलच्या प्लेस्टोअरवर अनेक ॲप्स आहेत. ‘इंडियन रेल्वे ट्रेन स्टेटस, व्हेअर इज माय ट्रेन, इंडियन रेल्वे ट्रेन इन्क्वायरी’ असे अनेक ॲप्स उपलब्ध झाले आहेत. ॲप डाऊनलोड करून त्यावर ट्रेन लोकेशन तपासता येते. केवळ रेल्वेचा क्रमांक टाकला; तर रेल्वे कुठल्या स्टेशनवर आहे, कुठल्या स्टेशनवर किती वाजता पोचणार आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे ही माहिती शहरातील रिक्षाचालकांसाठी पर्वणीच ठरली आहे.

काय करतात रिक्षाचालक? 
शहरातील अनेक म्हणजे शेकडो रिक्षाचालक रेल्वेस्थानकावरून व्यवसाय करतात. रेल्वे आली की रेल्वेस्थानक ते टीव्ही सेंटर, शहागंज, सिडको, चिकलठाणा, वाळूज महानगर अशा विविध भागांत जाणाऱ्या प्रवाशांचे भाडे मिळते. त्यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेला अनेक रिक्षाचालक रेल्वेस्थानकावर येतात; मात्र रेल्वे गेल्यानंतर रेल्वेस्थानकावरून प्रवासी मिळत नाहीत. म्हणूनच रिक्षाचालक रेल्वे येण्याच्या वेळेवर स्थानकावर येतात. रिक्षाचालकांना पूर्वी रेल्वेस्थानकावर येऊन थांबावे लागत होते. रेल्वेस्थानकावर येऊन थांबल्यानंतर रेल्वे लेट असल्याचे समजत होते; मात्र आता मोबाईल ॲप्समुळे रिक्षाचालक रेल्वेस्थानकावर येण्याची घाई करत नाहीत. ते शहरातील अन्य ठिकाणी प्रवाशांची वाहतूक करतात, रेल्वे येण्याच्या वेळेच्या दहा मिनिटे अगोदर ॲप्सवरून रेल्वेचे लोकेशन कळते. रेल्वे चिकलठाणा किंवा रोटेगावपर्यंत आली, की रिक्षाचालक रेल्वेस्थानकाच्या दिशेने निघतात आणि रेल्वे पोचण्याच्या पूर्वीच रेल्वेस्थानकावर पोचतात. 

त्रास टळला, वेळही वाचला!
नांदेड ते मनमाड हा एकेरी रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे रेल्वेच्या क्रॉसिंगमुळे रेल्वेगाड्या कायमच उशिराने धावत असतात. विशेषत: अमृतसर-नांदेड, नांदेड-अमृतसर या दोन्ही एक्‍स्प्रेस नेहमीच उशिराने धावतात. याशिवाय देवगिरी, नंदीग्राम, काकीनाडा, मराठवाडा एक्‍स्प्रेस या गाड्याही अनेक वेळा उशिराने धावत असतात. मोबाईल ॲप्सवर रेल्वे नेमकी कुठे आहे, हे कळते. रेल्वेलाइनवर रेल्वेचे लोकेशन कळते. त्यानुसार तिला रेल्वेस्थानकावर येण्यास किती वेळ लागणार याचाही अंदाज बांधता येतो. त्यामुळे रेल्वेच्या धावण्याच्या वेळेचा अंदाज घेतल्याने रिक्षाचालकांना वेळ आणि त्रासही वाचण्यास मदत होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com