स्मार्ट सिटीच्या बोधचिन्हात गेटवेसह ताजमहालची कोंबाकोंबी

आदित्य वाघमारे
सोमवार, 26 मार्च 2018

स्मार्ट सिटीच्या बोधचिन्हात असलेला दरवाजा औरंगाबादेतील नसून तो "गेटवे ऑफ इंडिया' आहे. शहरात अशा पद्धतीचा दरवाजाच नाही. त्याशिवाय असलेली दुसरी वास्तू ही मकबरा नसून ताजमहाल आहे. मकबऱ्याचे मिनार हे येथील मुख्य वास्तूपेक्षा उंच आहेत पण ताजमहालचे मिनार मुख्य वास्तूपेक्षा कमी उंचीचे आहेत. 
- डॉ. दुलारी कुरैशी, इतिहास अभ्यासक. 

औरंगाबाद -अजिंठा-वेरूळ लेणीसारख्या जागतिक वारसास्थळांचा जिल्हा, दख्खनचा ताज व 52 दरवाजांचे शहर असलेल्या औरंगाबादेतील एकही वास्तू स्मार्ट सिटीच्या लोगोसाठी लायक नाही, असे प्रशासनाला वाटत असावे. म्हणून तर औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या लोगोमध्ये स्थानिक वास्तूंना डावलून मुंबईचे "गेटवे ऑफ इंडिया' आणि आग्य्राचा "ताजमहाल' यांना स्थान देण्यात आले आहे. 

औरंगाबाद महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी "स्पेशल पर्पज व्हेइकल'ची (एसपीव्ही) स्थापना केली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) या "एसपीव्ही'च्या बोधचिन्हात (लोगो) स्थानिक वास्तूंना बगल देऊन "गेटवे ऑफ इंडिया' आणि "ताजमहाल'चे चित्र वापरण्यात आले आहे. 

शहराला स्मार्ट करण्याचे काम पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणेने स्मार्ट सिटी आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी या संकल्पनेवर आधारित बोधचिन्ह तयार केले आहे. शहरात ऐतिहासिक दरवाजे, बिबी का मकबरा यांसह कित्येक ऐतिहासिक वास्तू आहेत. असे असतानाही या बोधचिन्हात औरंगाबादच्या एकाही दरवाजाची छबी न घेता चक्क मुंबईतील "गेटवे ऑफ इंडिया' या ब्रिटिश राजवटीतील वास्तूचे चित्र वापरले. हे काय कमी होते की काय म्हणून, अजिंठा-वेरूळपाठोपाठ पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेल्या बिबी का मकबऱ्यालाही गहाळ करत त्या जागी ताजमहाल लावण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी आणि प्रभारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी लोगोसाठी त्यांची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. राज्याची पर्यटन राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहराला आता ताजमहाल आणि "गेटवे ऑफ इंडिया'ची पुण्याई स्मार्ट सिटी बनवणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

हा दरवाजा आपल्याकडील नाही

स्मार्ट सिटीच्या बोधचिन्हात असलेला दरवाजा औरंगाबादेतील नसून तो "गेटवे ऑफ इंडिया' आहे. शहरात अशा पद्धतीचा दरवाजाच नाही. त्याशिवाय असलेली दुसरी वास्तू ही मकबरा नसून ताजमहाल आहे. मकबऱ्याचे मिनार हे येथील मुख्य वास्तूपेक्षा उंच आहेत पण ताजमहालचे मिनार मुख्य वास्तूपेक्षा कमी उंचीचे आहेत. 
- डॉ. दुलारी कुरैशी, इतिहास अभ्यासक. 

तपासणी करून बदल सांगू 
औरंगाबाद स्मार्ट सिटीचे बोधचिन्ह तयार करताना आपली संमती घेण्यात आलेली नव्हती. बोधचिन्ह तपासून त्यात अन्य शहरांच्या वास्तू आढळल्यास ते बोधचिन्ह बदलण्यात येईल. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी व प्रभारी महापालिका आयुक्‍त. 

Web Title: marathi news aurangabad news Aurangabad Smart city logo with gateway and taj mahal