कर्करोग निदानासाठी आता फिरता दवाखाना

मनोज साखरे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

स्तन व गर्भाशयमुख कॅन्सरशी निगडित ग्रामीण भागातील महिला भीती, दुर्लक्ष, लज्जा यामुळे आजाराबाबत फारशा बोलत नाहीत. त्या अंगावर दुखणे काढून जीवन व्यतीत करतात. यादरम्यान पहिल्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आजार कधी बळावतो हेही कळत नाही. अशा महिलांचे वेळीच निदान करून आजारावर वेळेतच उपचार व्हावेत. कॅन्सर आजाराबाबत त्यांच्यात जागृती घडावी म्हणून उपक्रम राबवीत आहोत.
- अंजू गोडबोले, सल्लागार, गेब्स फाउंडेशन.

औरंगाबाद - ग्रामीण भागातील कर्करोगाने पीडित महिलांसाठी गेब्स फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. फिरता दवाखाना या संकल्पनेच्या माध्यमातून गावागावांत गर्भाशयमुख व स्तनकॅन्सरची मोफत तपासणी करून त्यांना उपचारासंबंधी योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ५० गावांत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

कन्सरने अनेकजण पीडित आहेत. विशेषत: आजार तिसऱ्या टप्प्यात असताना काहींना याचे निदान होते. दुर्लक्ष, तसेच केवळ तपासणी न केल्याने आजार बळावून अनेक रुग्ण मृत्यूशी झगडतात. खासकरून स्तन व गर्भाशयमुख कॅन्सर आजाराने महिला ग्रस्त असतात. यात शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांचे मोठे प्रमाण आहे; परंतु त्यांच्याकडून याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आजार बळावल्यावर कॅन्सरचे निदान झाल्यानंतर मात्र त्यांची पायाखालची जमीन सरकते, अशी असंख्य उदाहरणे आहेत. अशा पीडित महिलांसाठी गेब्स फाउंडेशन, जिल्हा परिषद व एमजीएम रुग्णालय यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. ग्रामीण महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान, तपासणी, उपचारांचे मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच रास्त दरात उपचार करून देण्यासाठी मदतही केली जाणार आहे. क्‍लिनिक ऑन व्हिल्स सेवेअंतर्गत पन्नास गावांतून, कॅन्सर निदान चाचण्या, तपासणी झालेल्या महिलांच्या समस्यांचा पाठपुरावा केला जाईल. तसेच अद्ययावत तपासणी यंत्रणा, तसेच गावकरी महिलांमधून निवडलेल्या आणि प्रशिक्षण घेतलेल्या आशा आणि आरोग्यमित्रांच्या सहकार्याने शिबिरांतून पॅप स्मिअर टेस्ट होतील.  

मोबाईल हॉस्पिटलद्वारे काम
तीस ते साठ वयोगटातील महिलांत गर्भाशयमुख, स्तन कॅन्सरबाबत प्रबोधन केले जाईल. या कॅन्सरचे निदान करणारी चाचणी (पॅप स्मिअर टेस्ट) केली जाणार आहे. तपासणी चाचण्या सुयोग्य करण्यासाठी गावातील महिलांची आरोग्य मित्र म्हणून निवड करून त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. 

घरोघरी तपासणी
ग्रामीण भागात सर्वाधिक स्तनाचे व गर्भाशयाचे कॅन्सर रुग्ण आढळतात. अशा रुग्णांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटीत) मेमोग्राफी व सोनोग्राफी सवलीतीच्या दरात शुल्क आकारले जाते; मात्र ग्रामीण भागातील महिला या तपासणीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, आजाराची तीव्रता वाढते. हे टाळण्यासाठी ही संस्था घरोघरी जाऊन ग्रामीण महिलांची मोफत तपासणी करणार आहे.

Web Title: marathi news aurangabad news cancer Circulatory clinic