आरक्षणासाठी मराठा-पाटीदार उभारणार एकत्र लढा

राजेभाऊ मोगल
रविवार, 27 मे 2018

आता गनिमी कावा 

आगामी काळात आरक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्यास जे प्रस्थापित मराठा नेते विरोध करतील त्यांना आडवे करू; तसेच गनिमी काव्याच्या माध्यमातून समाजविरोधी नेत्याला फिरणे अवघड होईल, असा इशाराही श्री. जावळे यांनी दिला.

औरंगाबाद - अखिल भारतीय छावा संघटनेचे अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन मंगळवारी (ता. 29) होत आहे. या वेळी गुजरातचे युवा नेते हार्दिक पटेल यांची विशेष उपस्थिती राहील. दरम्यान, आरक्षणासाठी आगामी काळात या अधिवेशनातून मराठा-पाटीदार असा एकत्र लढा उभारण्यात येणार आहे. शिवाय या वेळी श्री. पटेल यांचा "मराठा मित्र' पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शनिवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. जावळे म्हणाले, की सिडकोतील राजीव गांधी मैदानावर दुपारी चार वाजता या महाअधिवेशनास सुरवात होईल. अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते समोर आणण्याचे काम संघटनेने केले आहे. केवळ मूठभर मराठा समाजाची प्रगती झाली; मात्र उर्वरित कष्ट करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न कायम आहेत. ते सोडविण्याचे काम सरकारदरबारी होताना दिसत नाही. त्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. मराठा समाजाने राज्यात लाखोंचे भव्य असे 58 मोर्चे काढले; मात्र सरकारची इच्छाशक्ती नसल्याने आरक्षणाच्या प्रश्नावर वेळकाढूपणा सुरू आहे. याप्रश्‍नी समविचारी संघटनांना सोबत घेत लढा दिला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

पत्रकार परिषदेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवाजी मार्कंडे, विशाल सुर्यवंशी, मनोहर सनेर, नवनाथ काळे, अमर जगताप, कैलास वाघ, प्रविण भुसारे, किरण काळे, दत्ता भोकरे, अशोक मोरे आदी उपस्थित होते. 

आता गनिमी कावा 
आगामी काळात आरक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्यास जे प्रस्थापित मराठा नेते विरोध करतील त्यांना आडवे करू; तसेच गनिमी काव्याच्या माध्यमातून समाजविरोधी नेत्याला फिरणे अवघड होईल, असा इशाराही श्री. जावळे यांनी दिला.

Web Title: marathi news aurangabad news Fight together with Maratha-Patidar for reservation