माजी शिवसैनिकांचा खासदार खैरेंवर हल्लाबोल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मराठवाड्यातील विविध मागण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. तत्पूर्वी, मराठवाड्यातील सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करावी. मागण्यांचे निवेदन अगदी राष्ट्रपतींपर्यंत पाठवले आहे. याबाबत एक महिन्याने पुन्हा आढावा घेणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात माजी शिवसैनिकांची मोट बांधून सुभाष पाटील यांनी "मराठवाडा विकास सेने'ची स्थापना केली असून, पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील विविध प्रश्‍नांवर मंगळवारी (ता. 23) विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा गुलमंडीवर पोचल्यावर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत त्यांच्यावरच हल्लाबोल करण्यात आला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मविसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. क्रांती चौकात सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडे मोर्चा निघाला होता. हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवा रुमाल टाकून घोषणाबाजी करीत होते. मोर्चा गुलमंडीवर आल्यावर पाटील आणि सहकाऱ्यांचे हार तुऱ्यांनी स्वागत केले. याचवेळी माईक हातात घेत "गुलमंडीवरील बंद पडलेले घड्याळ तीस वर्षांत दुरुस्ती केली नाही. ते शहराचा विकास काय करणार?' तसेच समांतर पाणी प्रश्‍न उपस्थित करत खासदार खैरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मविसेनेच्या मोर्चातील नियोजित पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्‍त कार्यालयात जाऊन निवेदन दिले. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसमोर भाषणे झाली. 

राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात मराठवाड्याच्या विकासासंदर्भात प्रत्येक क्षेत्रातील अनुशेष भरून काढावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कापसावरील बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, तेलंगणाप्रमाणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांमुलींना वसतिगृहात मोफत प्रवेश द्या, शैक्षणिक शुल्क माफ करा, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, सहकारी बँकांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा, बेरोजगारी दूर करताना भूमिपुत्रांना न्याय द्या, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मोर्चात सुभाष पाटील यांच्यासोबत अविनाश कुमावत, रमेश सुपेकर, राजू कुलकर्णी, सदानंद शेळके, किशोर पाटील या नियोजित कार्यकारिणी सदस्यांसह माजी शिवसैनिकांसह महिलांचीही उपस्थिती होती.

शेवटी मी रस्त्यावरचाच माणूस 

मराठवाड्यातील विविध मागण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. तत्पूर्वी, मराठवाड्यातील सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करावी. मागण्यांचे निवेदन अगदी राष्ट्रपतींपर्यंत पाठवले आहे. याबाबत एक महिन्यांने पुन्हा आढावा घेणार आहे.

मागण्या मान्य नाही झाल्या तर, मी शेवटी रस्त्यावरचाच माणूस आहे. पूर्वीप्रमाणे रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करेन, असे सुभाष पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Aurangabad News Former Shivsena activist criticizes khaire