कचऱ्याची स्थिती गंभीरच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची स्थिती काही प्रभागांत अद्याप गंभीरच असून, सुमारे दोन हजार टन कचरा रस्त्यावर पडून आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी महापालिका, शासनाच्या जागा उपलब्ध असताना नागरिक विरोध करीत आहेत. कचरा प्रक्रियेमुळे कोणाला त्रास झाल्यास जबाबदारी माझी राहील, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (ता. १७) केले. कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तीन मोठे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

शहरातील कचऱ्याची कोंडी २९ व्या दिवशीही कायम आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. १६) शासनाने महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली करून त्यांचा पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिला. पदभार घेताच त्यांनी कामाला सुरवात केली आहे. शुक्रवारी महापालिका अधिकारी, वॉर्ड अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. शनिवारी पहाटेपासून त्यांनी प्रत्येक प्रभागात पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत श्री. राम म्हणाले, की प्रभाग चार ते नऊमध्ये ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण प्रभावीपणे करण्यात येत आहे; मात्र एक ते तीनमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या प्रभागांसह शहरात अद्याप दोन हजार टन कचरा पडून असून, त्यात दररोज निघणाऱ्या कचऱ्याची भर पडत आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयत्न आहे, महापालिकेकडे १०२ जागा आहेत; मात्र तिथे खतनिर्मिती करण्यास प्रचंड विरोध असल्याने अडचणी वाढल्या आहेत. सध्या पडून असलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटू नये, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून इएम सोल्यूशन वापरण्यात येत आहे. 

त्रास झाल्यास मी जबाबदार
कचरा एकाच ठिकाणी जमा करणे हे बेकायदा असून, त्याला न्यायालय, शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे कचऱ्यावर प्रक्रिया करूनच विल्हेवाट लावावी लागणार आहे; मात्र जागांना विरोध करणारे नागरिक समजून घेत नसल्याची खंत प्रभारी आयुक्तांनी व्यक्त केली. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करताना एका मीटरवर जरी घर असले, तरी डास, वास, माश्‍यांचा त्रास होत नाही, परिसरातील पाणी दूषित होत नाही, कोणाला त्रास झाल्यास जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

जागेचा शोध सुरूच 
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदी करून काम सुरू होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मोठ्या प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरूच आहे, असे श्री. राम यांनी सांगितले.

रात्रीही उचलणार कचरा 
अनेक नागरिक रात्री कचरा रस्त्यावर आणून टाकतात. त्यामुळे महापालिकेने रात्रीदेखील कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वॉर्ड अधिकाऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आल्यामुळे त्यांना तातडीने उपाययोजना करता येतील. मोठे निर्णय फक्त सूचना देऊन घेण्यात यावेत, अशा सूचना वॉर्ड अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: marathi news aurangabad news garbage