सात वर्षांपासून परसबागेत कचऱ्यापासून विनाखर्च खतनिर्मिती

औरंगाबाद - परसबागेत कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रकाश कदम.
औरंगाबाद - परसबागेत कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रकाश कदम.

औरंगाबाद - दिवसेंदिवस चिंतेचा बनत चाललेला कचऱ्याचा प्रश्‍न, त्यावर तोडगा निघण्याऐवजी रोज नवीन समस्या उद्भवत आहेत; मात्र पुंडलिकनगर भागातील रहिवासी प्रकाश कदम यांनी तब्बल सात वर्षांपूर्वीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच लाभदायी ठरणारा खतनिर्मितीचा पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी घराच्या परसबागेत कचऱ्याची विल्हेवाट लावत चक्क कचऱ्यापासून खतनिर्मिती केली आहे. या खतामुळे परसबागेतील झाडे फुला-फळांनी डवरली असून, ही सेंद्रिय फळे पाहून इतरांनीही हा विनाखर्च खतनिर्मितीचा धडा घेतला आहे. 

प्रकाश कदम यांनी नोकरी सांभाळून घराच्या परसबागेकडेही चांगले लक्ष दिले आहे. दरम्यान दररोज महापालिकेची कचरा गाडी आली, की घरात निघणारा अर्धा - एक किलो ओला-सुका कचरा घेऊन जाणे त्यांना पटले नाही. यावर त्यांना एक कल्पना सुचली. ती म्हणजे कचरा व्यवस्थापनातून खतनिर्मिती. यासाठी काहीही खर्च नसल्याने ही कल्पना त्यांनी तातडीने अमलातही आणली. कचऱ्यापासून केलेल्या खतनिर्मितीमुळे परसबागेतील फुलझाडांना आलेली फुले, फळझाडांना आलेली फळे सेंद्रिय आहेत. समस्येविषयी ओरड करण्यापेक्षा त्यावर स्वतः मार्ग काढण्याचा वस्तुपाठ त्यांनी दिला आहे. या खतनिर्मितीमुळे चिकू, आंबा, डाळिंब, पेरू, फुलझाडे आदींना फायदा झाला आहे. 

अशी केली खतनिर्मिती  
घरातील ओला- सुका कचरा एकत्र करून परसबागेत दीड फूट लांबी-रुंदीचा खड्डा घेतला. त्यात आठवडाभराचा सात -आठ किलो कचरा टाकला. त्यावर माती टाकली. पाण्याचा शिडकावा मारला. साधारण १७ ते १८ दिवसांनी कचऱ्याचे उत्तमोत्तम खत झाले. परसबागेत पुन्हा दुसऱ्या ठिकाणी खड्डा घेऊन परत तीच कृती केल्याने पूर्ण परसबागेतील फळझाडे, फुलझाडांना त्याचा फायदा झाला आहे. घरात येणारी कॅरिबॅगही सात वर्षांपासून बंद केल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.

रेनवॉटर हार्वेस्टिंगने केले बोअर पुनर्भरण 
श्री. कदम यांनी पावसाळ्यात इमारतीवरून पडणारे पाणीही वाया जाऊ दिलेले नाही. रेनवॉटर हार्वेस्टिंग करून बोअर पुनर्भरणाचा प्रयोग केल्याने बोअरलाही पाणी कमी पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी केवळ अकराशे रुपये खर्च आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com