कचऱ्यातून निघतायेत धुरांचे लोट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची कोंडी तब्बल 26 दिवसांनंतरही कायम असून, कचऱ्याच्या साचलेल्या ढिगाला आता नागरिकच आगी लावत आहेत. त्यातून निघणाऱ्या धुराच्या लोटांमुळे परिसरातील नागरिकांचा श्‍वास गुदमरत आहे. बुधवारी (ता. 14) कचऱ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौर, पदाधिकाऱ्यांना संतप्त महिलांनी घेराव घालून जाब विचारला. दरम्यान, शासनाने कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आणखी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

शहराची कचराकोंडी सोडविण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन कामाला लागल्याचे चित्र उभे केले जात असले, तरी 26 दिवसांनंतरही हजारो टन कचरा विविध भागांत पडून आहे. त्याला नागरिक आगी लावत आहेत. ओल्या-सुक्‍या कचऱ्यातून निघणाऱ्या धुराच्या लोटांमुळे परिसरातील नागरिकांना श्‍वास घेणे अवघड झाले आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकारी पाहणीसाठी गेले असता, पदमपुरा भागात संतप्त महिलांनी हा धूर कधी बंद होणार, असा जाब विचारला. अग्निशामक विभागाला पाचारण करून कचऱ्याला लागलेली येथील आग विझविण्यात आली. विभागीय आयुक्तांनी शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, व्यापारी महासंघाची बैठक घेऊन सहकार्याचे आवाहन केले आहे.

Web Title: marathi news aurangabad news garbage fire