औरंगाबादेत कचरा ‘पेटला’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

औरंगाबाद - शहरात गेल्या वीस दिवसांपासून निर्माण झालेल्या अभूतपूर्व कचराकोंडीला बुधवारी हिंसक वळण लागले. शहरातील मिटमिटा भागात कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या वाहनांवर संतप्त जमावाने तूफान दगडफेक केली. त्यातील दोन वाहने पेटवून दिली. अग्निशामक दलाचे एक तर पोलिसांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. राज्य राखीव पोलिस बलाच्या (एसआरपीएफ) एका वाहनावर हल्ला चढवत जमाव उग्र बनला. यात तीन अधिकारी, नऊ पोलिस जखमी झाले. प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रुधुरांच्या वीस नळकांड्या फोडून लाठीमार केला. त्यात अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.

औरंगाबाद शहरातील कचरा गेल्या चाळीस वर्षांपासून नारेगाव येथील डेपोत जातो. त्याला विरोधासाठी तेथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. हा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह विधिमंडळ अधिवेशनात गेला आहे. ठिकठिकाणी पर्यायी जागा शोधताना महापालिकेची दमछाक होत असून अशा जागांबाबतही नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

परिणामी वीस दिवसांपासून कचराकोंडी कायम आहे. नागरिकांचा विरोध धुडकावून महापालिकेची दहा वाहने कचरा टाकण्यासाठी आज दुसऱ्यांदा मिटमिटा परिसरातील ‘सफारी पार्क’ येथे दुपारी दोननंतर पोलिस बंदोबस्तात जात होती. औरंगाबादेतून दौलताबाद रस्त्यावरून वाहने मिडॉस हॉटेलपर्यंत सहजरीत्या गेली; परंतु त्यानंतर समोरून सुमारे तीनशे ते चारशे जणांना जमाव चालून आला. त्यांनी वाहने अडविली व रस्त्यावर ठिय्या मांडला. जमावाची समजूत घालण्यासाठी महापालिकेचे अधिकारी तसेच पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु, जमावातील तरुण संतप्त झाले व त्यांनी दगडफेक सुरू केली. 

‘एसआरपीएफ’च्या वाहनावर हल्ला 
स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य राखीव पोलिस बलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या घटनास्थळी येताच या तुकडीच्या एका वाहनावर जमावाने लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवत दगडफेक केली. यात सातपेक्षा अधिक जवान जायबंदी झाले. तसेच एका महिला पोलिस निरीक्षकाच्या तोंडावर दगडाचा जोरदार प्रहार बसून त्या जखमी झाल्या. एकूण तीन पोलिस अधिकारी व नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही जमावाच्या दिशेने दगडफेक केली. 

Web Title: marathi news aurangabad news garbage issue