औरंगाबाद शहराचा श्‍वास गुदमरणार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

नगरसेवकांच्या बैठकीत होणार खल 
कचरा कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सकाळी ११.३० वाजता नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. शहरात साचलेल्या कचऱ्यावर काय तोडगा काढायचा, यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

औरंगाबाद - नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोविरोधात सोमवारी (ता. १९) चौथ्या दिवशीही नागरिकांचे आंदोलन सुरूच असून, या काळात सुमारे दीड हजार टन कचरा शहराच्या विविध भागांत साचलेला आहे. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, कचऱ्याच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने आयोजित केलेली बैठकदेखील निष्फळ ठरली. दरम्यान, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याच्या निविदा दोन दिवसांत काढण्यात येतील, असे महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले. 

नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी शुक्रवारपासून (ता. १६) आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून कचऱ्याची एकही गाडी नारेगाव कचरा डेपोकडे गेलेली नाही. दरम्यान, महापालिकेने बाभूळगाव येथे एका खासगी जागेत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे विरोध झाला. सफारी पार्क, चिकलठाणा येथील गायरान जागेवर कचरा टाकण्यास तीव्र विरोध झाल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी महापालिकेला दोन महिन्यांचा वेळ देण्यात यावा, असा प्रस्ताव ठेवला होता; मात्र तो आंदोलनकर्त्या नागरिकांनी धुडकावला. दरम्यानच्या काळात शहरातील मोकळ्या जागांमध्ये खड्डे करून त्यात कचरा टाकण्यात येत आहे. असे असले, तरी आजघडीला सुमारे दीड हजार टन कचरा रस्त्यावर पडून आहे. महापालिकेने शुक्रवारी भरलेल्या गाड्या अद्याप सेंट्रल नाका येथेच उभ्या असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

नक्षत्रवाडीत शिवसेना आमदारांचा विरोध  
कचऱ्याच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची सुभेदारी विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या वेळी आयुक्‍त मुगळीकर यांनी येत्या दोन दिवसांत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात येईल, निविदा प्रक्रिया अंतिम होईपर्यंत कचरा टाकण्यासाठी नक्षत्रवाडी येथील जागा वापरता येऊ शकते, असे स्पष्ट केले. त्यावर आमदार शिरसाट यांनी विरोध केला. या भागाचा झपाट्याने विकास सुरू आहे. त्यामुळे कचरा इकडे नको, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे बाभूळगाव येथे देखील शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी विरोध केला होता. 

सफारी पार्कची केली पाहणी 
सफारी पार्कसाठी शासनाने महापालिकेला मिटमिटा भागात शंभर एकर जागा दिली आहे. या जागेत कचरा टाकण्यासाठी सोमवारी पाहणी करण्यात आली.

यापूर्वी रावसाहेब आमले व सुभाष शेजवळ या शिवसेना नगरसेवकांनी या भागात कचरा टाकण्यासाठी विरोध केला होता; मात्र सफारी पार्कच्या दुसऱ्या टोकाला कचरा टाकल्यास नागरिकांना त्रास होणार नाही, असे शेजवळ यांचे म्हणणे होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी दुपारी पाहणी केली.

ठिकठिकाणी साचला तब्बल दीड हजार टन कचरा
चौथ्या दिवशीही तिढा कायम, वाहनांमधून दुर्गंधी
शिवसेनेची बैठक निष्फळ, आज नगरसेवकांची बैठक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aurangabad news garbage pollution