कचऱ्याच्या गाड्या, जेसीबी उद्योजकांनी रोखले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याची कोंडी तब्बल 26व्या दिवशीही कायम आहे. परिसरातील ग्रामस्थांपाठोपाठ आता उद्योजकही रस्त्यावर उतरले असून, चिकलठाणा एमआयडीसीतील मोकळ्या जागेत खड्डे खोदून त्यात कचरा टाकण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न सोमवारी (ता. 12) त्यांनी हाणून पाडला. दरम्यान, कचऱ्याला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तासभर ठिय्या दिला.

कचऱ्याच्या प्रश्‍नावरून शहरात आंदोलन पेटलेले असतानाच दुसरीकडे कचऱ्याच्या साचलेल्या ढिगांना आगी लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. शहरात गेल्या 26 दिवसांपासून पडलेला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात अद्याप महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. सोमवारी दुपारी चिकलठाणा एमआयडीसीमध्ये असलेल्या एका मोकळ्या जागेत खड्डे खोदण्याचे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले. काही वेळानंतर येथे कचऱ्याने भरलेल्या गाड्याही मागविल्या. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना फोन केले. त्यांनी विरोध केल्यानंतर उद्योजकही रस्त्यावर उतरले. त्यांनी महापालिकेचा जेसीबी, गाड्या रोखून धरल्या.

दरम्यान, आमदार इम्तियाज जलील यांनी मिटमिटा भागात कचराविरोधी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी तासभर विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यापुढे एकाही ग्रामस्थाला अटक करण्यात येणार नाही, असे आश्‍वासन पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली.

Web Title: marathi news aurangabad news garbage vehicle jcb businessman