सूर्यप्रकाशाने केली वीजबिलातून सुटका

मधुकर कांबळे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सौरऊर्जेचे 16 पॅनेल बसविले आहेत. या विजेवरच विहिरीतून पाण्याचा उपसा होतो, टाकीत पाणी पडते आणि घराघरांत नळांना पुरवठा होतो. आता लोडशेडिंगची भीती अन्‌ बिल भरायचा तगादा नाही. पूर्वी चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा दिवसाआड व मुबलक प्रमाणात होत आहे. गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. 
- ज्ञानेश्‍वर दुधारे, सरपंच, आखातवाडा.

औरंगाबाद - गाव आणि तांडा मिळून सुमारे दोन हजार लोकसंख्या. यांना पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या विजेचे वर्षाला कमीत कमी 60 हजार रुपये वीजबिल भरावे लागायचे, तरीही कधी लोडशेडिंग; तर कधी वीजबिल थकले तर पाणीपुरवठ्याची वीज तोडू म्हणताच गावकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळायचे. या साऱ्या कटकटीतून खुलताबाद तालुक्‍यातील आखातवाडा गावाची सौरऊर्जेमुळे सुटका झाली आणि वर्षाकाठी भराव्या लागणाऱ्या वीजबिलाची बचत झाली. 

जगप्रसिद्ध वेरूळपासून सुमारे 12 ते 14 किलोमीटर अंतरावर औरंगाबाद-धुळे महामार्गावरचे गाव आखातवाडा महामार्गापासून आतमध्ये सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास. सार्वजनिक नळाचे आठ-नऊ स्टॅंडपोस्ट आणि 200 घरांमध्ये नळजोडणी आहे.

गावाला स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जायचा. यासाठी साडेसात अश्‍वशक्‍तींच्या इलेक्‍ट्रिक पंपाद्वारे पाणी दिले जात असे; मात्र ग्रामीण भागातील लोडशेडिंगमुळे विहिरीत पाणी असूनही पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागायचे. जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाच्या देखभाल-दुरुस्ती कक्षाचे उपअभियंता तथा योजनेचे तांत्रिक मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले,

14 व्या वित्त आयोगाच्या शासन निर्णयात सोलार पंप बसविण्यास प्राधान्य दिल्याने ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून सोलार पंप बसविण्याचे सुचविण्यात आले होते. त्यानुसार पाणीपुरवठा योजनेवर पाच अश्‍वशक्‍तींचा सौरपंप बसविण्यासाठी 5.50 लाखांचे अंदाजपत्रक केले; मात्र प्रत्यक्षात 5.25 लाखांत काम झाले.

मे 2017 मध्ये योजना पूर्ण झाली. सौरऊर्जेवरील पंपाची देखभाल-दुरुस्ती पाच वर्षे संबंधित कंपनी करणार असल्याने प्रशासनाची देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात बचत झाली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर सचिव श्‍यामलाल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनीही या योजनेची प्रशंसा केली. कार्यकारी अभियंता ए. एम. घुगे यांनी सांगितले.

स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजनेवर सौरपंप बसविल्यामुळे आखातवाडा येथील 45 हजार लिटर क्षमतेची, तर आखातवाडा तांड्यावरील 25 हजार लिटर क्षमतेची असे दोन्ही टाक्‍या मिळून 70 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्‍या नियमित भरत आहेत. 

सौरऊर्जेचे 16 पॅनेल बसविले आहेत. या विजेवरच विहिरीतून पाण्याचा उपसा होतो, टाकीत पाणी पडते आणि घराघरांत नळांना पुरवठा होतो. आता लोडशेडिंगची भीती अन्‌ बिल भरायचा तगादा नाही. पूर्वी चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा दिवसाआड व मुबलक प्रमाणात होत आहे. गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. 
- ज्ञानेश्‍वर दुधारे, सरपंच, आखातवाडा. 

Web Title: marathi news aurangabad news grampanchayat Saur Urja Energy