इज्तेमातील साथींसाठी जेवण, पाण्याची चोख व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - लिंबेजळगाव येथील राज्यस्तरीय इज्तेमाच्या सोमवारी (ता.२६) झालेल्या समारोपानंतर लिंबेजळगाव ते औरंगाबाद शहरात येणाऱ्या सर्व साथींसाठी खिदमदगारांनी (स्वयंसेवक) २४ तास अथक परिश्रम करीत रेल्वस्थानक, बसस्थानक तसेच शहरातील अनेक भागांत जेवण, पाण्याची चोख व्यवस्था केली. 

औरंगाबाद - लिंबेजळगाव येथील राज्यस्तरीय इज्तेमाच्या सोमवारी (ता.२६) झालेल्या समारोपानंतर लिंबेजळगाव ते औरंगाबाद शहरात येणाऱ्या सर्व साथींसाठी खिदमदगारांनी (स्वयंसेवक) २४ तास अथक परिश्रम करीत रेल्वस्थानक, बसस्थानक तसेच शहरातील अनेक भागांत जेवण, पाण्याची चोख व्यवस्था केली. 

इज्तेमाच्या समारोपानंतर औरंगाबाद शहराकडे लाखोंच्या संख्येने साथी आले. लिंबेजळगाव येथून येण्यासाठी वाहने अपुरी पडत असल्याने अनेक साथी रात्री उशिरापर्यंत औरंगाबादेत पायीच दाखल झाले. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात इज्तेमातून आलेल्या साथींची तोबा गर्दी झाली होती. या सर्वांना पाण्याची व जेवणाची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी रात्रभर स्वयंसेवकांची धावपळ सुरू होती. स्वयंसेवकांनी पाण्याचे टॅंकर, पाणी पाऊच, बिस्किटे, जेवण साथींना दिले. जाण्यासाठी गाड्या अपुऱ्या पडल्याने अनेकांना रात्रभर रेल्वेस्थानक, बसस्थानकात मुक्काम करावा लागला.

मंगळवारी सकाळीसुद्धा हजारो साथी बसस्थानक, रेल्वेस्थानकात दाखल होत होते. त्यांच्यासाठी चहा, नाश्‍ता, जेवण तसेच पाण्याची व्यवस्था करण्याचे मॅसेज एकमेकांना पाठविले जात होते. शहरात अनेक घरातून तसेच ज्यांना जसे शक्‍य होईल तशी व्यवस्था करण्यात येत होती.

रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात स्वयंसेवक सर्व साथींना जेवण, पाणी, बिस्किटे देत होते. मंगळवारी (ता.२७) शहरातील विविध मशिदीत साथींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, तर अनेक घरातून साथींसाठी जेवण तयार करून ते पाठविण्यात येत होते. यामध्ये शेकडो खिदमदगार सहभागी झाले होते; तसेच लिंबेजळगावच्या रस्त्यानेही अनेक पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जेवण, बिस्किटांची पाकिटे पाठविण्यात आली.

रेल्वे, बसस्थानके तुडुंब
औरंगाबाद - राज्यस्तरीय इज्तेमाच्या समारोपानंतर परतीच्या प्रवाशांची मंगळवारी (ता. २७) सलग दुसऱ्या दिवशीही रेल्वेस्थानक बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली. औरंगाबाद आगाराने जादा गाड्या मागविल्या होत्या. यात एसटी प्रशासनाची दमछाक झाली. अचानक वाढलेल्या गर्दीने एसटीचे भारमान ८० टक्‍क्‍यांपर्यंत गेले होते. तर रेल्वेस्थानकावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. शिवाय औरंगाबादबाहेर जाणारे सर्व रस्ते जाम झाल्याने वाहतूक मंदावली होती. 

लिंबेजळगाव (ता. औरंगाबाद) येथील राज्यस्तरीय इज्तेमाच्या समारोपानंतर राज्याच्या कान्याकोपऱ्यांतून आलेल्या भाविकांची परतीसाठी लगबग सुरू झाली. येताना तीन ते चार दिवसांमध्ये टप्प्याटप्यांनी येणाऱ्या भाविकांची जाताना मात्र एकत्र गर्दी झाली. मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकावर तसेच रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. विविध ठिकाणी जाणारे जत्थेच्या जत्थे बसस्थानमांमध्ये घुसत होते. एसटी महामंडळाला इतक्‍या प्रचंड गर्दीचा पहिल्यांदाच अनुभव आला. दिवाळीच्या काळापेक्षाही ही गर्दी अधिक होती. एसटीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनापेक्षा पाच पट अधिक गर्दी झाल्याने महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बसगाड्यांची व्यवस्था करता-करता दमछाक झाली. संभाव्य गर्दी लक्षात घेता, पोलिस यंत्रणेकडूनही एसटी प्रशासनाला शंभर बसगाड्यांची व्यवस्था करून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मध्यवर्ती बसस्थानकातून सोमवारी १६०, तर मंगळवारी ७० जादा बस नियमित गाड्यांसोबत सोडण्यात आल्या.

Web Title: marathi news aurangabad news ijtemat food water