पहिल्या वाढदिवसालाच पित्याला अग्निडाग देण्याची वेळ 

सचिन चोबे
रविवार, 25 जून 2017

सिल्लोड : केळगाव (ता. सिल्लोड) शिवारातील गोकुळवाडी येथील हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या पार्थिवास त्यांचा एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र जाधव याने शनिवारी (ता. 24) सकाळी अग्निडाग दिला. या प्रसंगाचा साक्षीदार बनलेला पंचक्रोशीतील जनसमुदाय हे अनोखे दृश्‍य पाहून अक्षरशः हेलावला. अनेकांना शोक अनावर झाल्याने त्यांनी हुंदक्‍यांना मोकळी वाट करून दिली. 

सिल्लोड : केळगाव (ता. सिल्लोड) शिवारातील गोकुळवाडी येथील हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या पार्थिवास त्यांचा एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र जाधव याने शनिवारी (ता. 24) सकाळी अग्निडाग दिला. या प्रसंगाचा साक्षीदार बनलेला पंचक्रोशीतील जनसमुदाय हे अनोखे दृश्‍य पाहून अक्षरशः हेलावला. अनेकांना शोक अनावर झाल्याने त्यांनी हुंदक्‍यांना मोकळी वाट करून दिली. 

पुंछ सेक्‍टरमध्ये गुरुवारी (ता.22) सीमारेषेवर झालेल्या गोळीबारामध्ये हुतात्मा झालेले नाईक संदीप जाधव यांचा मुलगा शिवेंद्र याचा आज पहिला वाढदिवस होता. हा पहिलावहिला वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. नियतीला मात्र हे मंजूर नसावे. स्वतःच्या पहिल्या वाढदिवसालाच पित्याच्या चितेला अग्निडाग देण्याची वेळ शिवेंद्रवर आली. पित्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याच्या दिवसांमध्ये पित्याचे छत्र हरपले. देशाची सेवा करताना प्राणाची आहुती देऊन वीरमरण आलेल्या संदीप जाधव यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची आहे.

केळगावला प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाल्यावर सिल्लोडला त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावीत असतानाच वर्ष 2002 मध्ये भारतीय सैन्यदलामध्ये ते दाखल झाले. पंधरा वर्षांच्या नोकरीमध्ये त्यांनी विविध ठिकाणी सेवा केली. वर्ष 2012 मध्ये सैन्यदलातर्फे दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. मनमिळाऊ स्वभावाचे संदीप जाधव हे सुटी मिळाल्यावर गावी आल्यानंतर गोकुळवाडीतील प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. दोन महिन्यांपूर्वी सुटी संपवून परत गेल्यानंतर शनिवारी (ता.24) त्यांचा मुलगा शिवेंद्र याचा पहिलाच वाढदिवस होता. या वाढदिवसाला येण्याचे नियोजन त्यांनी केले होते, परंतु सीमेवर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुलाच्या वाढदिवसासाठी येण्याचा बेत त्यांनी रद्द केला. शिवेंद्रचा वाढदिवस साजरा करून त्याचा व्हीडीओ व्हॉट्‌सऍपवर पाठविण्याचे त्यांनी मित्रांना सांगितले होते. घरापासून कोसो मैल दूर राहून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना कुटुंबाच्या सुखदुःखात, सण-उत्सवामध्ये त्यांच्यासोबत सहभागी होण्याचे प्रसंग क्वचितच येतात. वडिलांना पुरते ओळखता येण्याचे वय नसताना या निरागस चिमुकल्यावर पित्याचे अग्निसंस्कार करण्याची वेळ आली.

Web Title: marathi news aurangabad news Indian army martyr Sandeep Jadhav