एसटी पार्सलचे तीनतेरा ! 

अनिल जमधडे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - एसटी महामंडळाने एसटी पार्सल सेवेचा करार रद्द केल्याने सुरळीत सुरू असलेल्या पार्सल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक वर्षांनंतर पुन्हा सेवा एसटीकडे आल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. महामंडळाकडूनही निश्‍चित आदेश व धोरण नाही. त्यामुळे पार्सल सेवा नको असलेले झेंगट अशी अवस्था पार्सल वितरणाची झाली आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने 2012 मध्ये पार्सल सेवेचे खासगीकरण केले होते. राज्याभरातील पार्सल वितरणाचे कंत्राट जळगावच्या अंकल पार्सल या खासगी संस्थेला देण्यात आले होते. असे असताना अचानक दोन महिन्यांपूर्वी कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने या खासगी कंपनीशी केलेला करार मोडीत काढला. त्यानंतर ही पार्सल सेवा महामंडळाने आपल्या ताब्यात घेतली. तेव्हापासून एसटीचे कर्मचारी पुन्हा पार्सल सेवेचे काम बघत आहेत; मात्र अनेक वर्षांनंतर हे काम करावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता आहे. त्यातच महामंडळाने याविषयी निश्‍चित धोरण नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत असल्यामुळे महामंडळाचे कर्मचारी पार्सलपासून सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असून, आलेले पार्सल नाकारण्याचे काम करण्यात येत आहे. अनेकांना पार्सल वितरण व्यवस्थेत काम करण्याचा कुठलाही अनुभव नाही. त्यामुळे त्यांना वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागत आहे. किंवा परिपत्रकाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात वरिष्ठ कार्यालयाने सुधारित दरपत्रक पाठविले नसल्यानेही कोणत्या पार्सलला किती दर आकारावा, हमाली किती द्यावी, अशा अवस्थेत कर्मचारी त्रस्त झाले आहेत. एकूणच एसटी पार्सल सेवेचा बोजवारा उडाला आहे. केवळ मासिक वर्गणीदार आणि पासधारकांचेच पार्सल वितरण सध्या सुरू आहेत. 

Web Title: marathi news aurangabad news msrtc post parcel