शरद पवार यांची सभा होणारच; परवानगी नाकारली तरी नेते ठाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या मराठवाडास्तरीय हल्लाबोल यात्रेचा शनिवारी (ता. 3) येथे समारोप होणार आहे. यानिमित्त हल्लाबोल मोर्चा निघेल. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे. पोलिस प्रशासनाने केवळ मोर्चालाच परवानगी देत सभेला लेखी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतप्त झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियोजित ठिकाणी, विभागीय आयुक्‍त कार्यालयाजवळ पवार यांची सभा घेणारच, असे ठणकावून सांगितले. 

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात काढण्यात आली. तुळजापूर येथून सुरू झालेली ही यात्रा आठही जिल्ह्यांत गेली. या यात्रेचा समारोप औरंगाबादेत होत आहे. सकाळी आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

दुपारी मोर्चाचे रूपांतर पवार यांच्या जाहीर सभेत होणार आहे. आज सायंकाळपर्यंत पोलिसांनी सभेला लेखी परवानगी दिलीच नाही. असे असले तरी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील दिल्ली गेटसमोर व्यासपीठ उभारणीचे काम सुरू होते. परवानगी नसल्याने हे काम थांबवा, असे पोलिसांनी या वेळी सांगितले.

ही बाब कळताच धनंजय मुंडे यांनी व्यासपीठाचे काम कुणी थांबवले, याचा पोलिसांना जाब विचारला. "यापूर्वी येथे भाजप नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत का, आता सभेसाठी विभागीय आयुक्त कार्यलायात घुसू का, सभा होऊ दिली नाही तर हजारो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर बसू,' असा इशारा त्यांनी दिला. त्यावर "काही अडचण नाही', असे सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला.

व्यासपीठ उभारण्याच्या परवानगीवरून दिवसभर वाद निर्माण झाला असला, तरी नियोजित ठिकाणी सभा होणारच, असे तटकरे यांनीही स्पष्ट केले.

Web Title: marathi news aurangabad news NCP Sharad Pawar Halla bol yatra