ड्रेनेजचे पाणी साचल्याने शाळेला सुट्टी

माधव इतबारे
शनिवार, 3 मार्च 2018

शाळेची इमारत रस्त्यापेक्षा खाली असून, ड्रेनेजचे पाणी थेट मैदानात गेले. चोकअप काढण्यात आले असल्याने सध्या समस्या मिटली असली तरी शाळेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पावडर फवारणी केली जाणार आहे. 
- नितीन साळवी, नगरसेवक

औरंगाबाद - शाळेच्या मैदानात तब्बल फुटभर ड्रेनेजचे पाणी साचल्यामुळे विद्यार्थांना सुट्टी द्यावी लागल्याचा प्रकार शनिवारी (ता. तीन) महुनगर येथे घडला. ड्रेनेजचे चोकअप काढल्यानंतर सोमवारी (ता. पाच) शाळा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

न्यू बालाजीनगरच्या पाठीमागे कमला नेहरू शिक्षण संस्था संचलित नाईक हायस्कूल आहे. या शाळेत सुमारे सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरुवारी (ता. एक) शाळेजवळील रस्त्यावर ड्रेनेज चोकअप झाले. त्यामुळे चेंबरमधून पाणी बाहेर पडून ते थेट शाळेच्या मैदानात आले. शाळेच्या मुख्याधिपिकेने हा प्रकार तत्काळ नगरसेवकाला कळविला. त्यांनी कामगार बोलावून चोकअप काढण्याचे काम केले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा तीच परिस्थिती उद्‌भवली. शुक्रवारी धूलिवंदनची सुट्टी असल्याने दिवसभर काम होऊ शकले नाही.

या दरम्यान शाळेच्या मैदानात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त फुटभर पाणी साचले. त्यामुळे शनिवारी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान, सकाळी सात वाजताच पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दुपारी बारा वाजेपर्यंत हे काम पूर्ण झाले. त्यानंतर साचलेले पाणी काढण्यात आल्याने सोमवारी शाळा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शाळेने उपाययोजना करावी 
शाळेची इमारत रस्त्यापेक्षा खाली असून, ड्रेनेजचे पाणी थेट मैदानात गेले. चोकअप काढण्यात आले असल्याने सध्या समस्या मिटली असली तरी शाळेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. सुमारे सहाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पावडर फवारणी केली जाणार आहे. 
- नितीन साळवी, नगरसेवक

Web Title: marathi news aurangabad news school drenej problem