शांतिगिरी महाराजांचे नाव काँग्रेसच्या यादीत - आमदार सत्तार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा शांतिगिरी महाराजांनी व्यक्त केलेली असतानाच आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी शांतिगिरी महाराजांचे नाव आपल्या पक्षाच्या यादीतही असल्याची गुगली सोमवारी (ता. २९) टाकली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सत्तार म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण पक्षश्रेष्ठींकडे दिली आहेत. औरंगाबाद, जालना या दोन्ही मतदारसंघाचे खासदार आणि जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आणण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शांतिगिरी महाराज यांना काँग्रेस उमेदवारी देणार का?’ या प्रश्‍नावर त्यांनी पक्षाकडे त्यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे सांगितले. यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवत दीड लाख मते घेतली होती. काँग्रेस पक्षाने या वेळी त्यांना उमेदवारी दिली; तर ते नक्कीच निवडून येतील असा दावा सत्तार यांनी केला.

फाईट नाही, आता फ्लाईट
तुमची फाईट कुणाशी असेल या प्रश्‍नावर आमची फाईट नाही, आता थेट दिल्लीची फ्लाइट असेल असे सांगत जालना आणि औरंगाबाद लोकसभेत काँग्रेसचाच विजय होणार असा विश्‍वास श्री. सत्तार यांनी व्यक्त केला. 

‘चकवा’ देणार 
औरंगाबाद, जालना या दोन्ही मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यास सज्ज आहे. प्राधान्य प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आव्हान देण्यासाठी असेल. रावसाहेब दानवे ‘चकवा’ देण्यासाठी ओळखले जातात; पण पक्षाने आपल्याला त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली तर त्यांनाच ‘चकवा’ देऊ असा टोला सत्तार यांनी या वेळी लगावला. 

काळे करणार बागडेंशी दोन हात
माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना लोकसभा लढवण्याची इच्छा नाही. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या जुन्या प्रतिस्पर्ध्याविरुद्धच पुन्हा दोन हात करण्याची त्यांनी तयारी केली आहे. कुस्तीच्या मैदानात जुन्या पहिलवानाला पराभूत करणे सोपे जाते, म्हणून ते फुलंब्री विधानसभाच लढवणार असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले.

Web Title: marathi news aurangabad news shantigiri maharaj congress abdul sattar