औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चातर्फे शिवसेना विरोधात बोंबाबोंब

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 1 मार्च 2018

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीबाबत विचारणा करण्यास गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकास बुधवारी (ता. 28) शिवसैनिकांनी मारहाण केली. या निषेधार्थ गुरुवारी (ता. एक) दुपारी बारा वाजता मराठा बांधवांनी क्रांती चौकात शिवसेनेविरुद्ध जोरदार बोंबा ठोकत घोषणाबाजी केली. तसेच शासनाच्या विविध फसव्या अध्यादेशांची होळी केली. 

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीबाबत विचारणा करण्यास गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकास बुधवारी (ता. 28) शिवसैनिकांनी मारहाण केली. या निषेधार्थ गुरुवारी (ता. एक) दुपारी बारा वाजता मराठा बांधवांनी क्रांती चौकात शिवसेनेविरुद्ध जोरदार बोंबा ठोकत घोषणाबाजी केली. तसेच शासनाच्या विविध फसव्या अध्यादेशांची होळी केली. 

19 फेब्रुवारीला तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी करण्यात आली. असे असताना शिवसेना-भाजपतर्फे चार मार्चला तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. हा महाराजांचा अवमान असल्याचा आक्षेप मराठा संघटनांनी घेतला आहे.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्‌घाटन सुरू असतानाच सावरकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जमले होते. याची माहिती मिळताच तेथे शिवसैनिक दाखल झाले. कशाला थांबलात, निघा येथून, अशा भाषेत हुसकावण्याचा प्रयत्न झाला; मात्र गांभीर्य लक्षात घेत माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करीत सर्वांना शांत करण्याचे काम करीत असतानाच शिवसैनिकांनी क्रांती मोर्चा समन्वयकांच्या अंगावर धाव घेत एकाचे कपडे फाडले.

या निषेधार्थ गुरुवारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शासनाने आतापर्यंत मराठा समाजाच्या अनुषंगाने काढलेल्या फसव्या अध्यादेशाची होळी करीत बोंब ठोकली. 
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की राज्यात मराठा समाजाने 58 मोठी मोर्चे काढूनही वेळकाढू धोरण राबविले. चार महिन्यांपासून तथाकथित मराठा नेत्यांसोबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

या प्रकारामुळे समाजाच्या मनात सरकारबद्दल रोष आणखी वाढला आहे. दुसरीकडे दोन वर्षांपासून मराठा क्रांती मोर्चातर्फे एकच तारखेनुसार शिवजयंती व्हावी, यासाठी जनजागृती करीत आहे. याचा परिणाम म्हणूनच नुकतीच तारखेनुसार झालेली शिवजयंती ऐतिहासिक ठरली. असे असताना पुन्हा भाजपा - शिवसेनेने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा घाट घातला आहे. हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा राज्यभर आंदोलने सुरू होतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. 

Web Title: marathi news aurangabad news shivsena maratha kranti morcha bombabomb