सुकाणू समितीचे राज्यव्यापी आंदोलन ; आज राज्यभर अन्नत्याग

अनिल जमधडे
रविवार, 18 मार्च 2018

शेतकऱ्यांच्या संपानंतर राज्य शासनाने सुकाणू समितीला लेखी अाश्‍वासने दिली होती. शासनाने मागण्या मंजूर करुनही अाश्‍वासने पाळली नाहीत. गेल्या आठवड्यात किसान सभेने काढलेल्या लॉंगमार्चनंतर सरकारला जाग आली व पुन्हा लेखी अाश्‍वासने देण्यात आली.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांच्या दृष्टीने राज्य शासनाने सुकाणू समितीला दिलेली अाश्‍वासने पाळली नाहीत. त्यामुळे अाश्‍वासने दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावेत, यासाठी सुकाणू समितीतर्फे सोमवारी (ता. 19) राज्यभर 'अन्नत्याग सत्याग्रह' करण्यात येणार आहे. त्यानंतर 23 मार्च ते 27 एप्रिलपासून राज्यभर "हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा' काढण्यात येत असल्याची माहिती समितीचे सदस्य सुभाष लोमटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शेतकऱ्यांच्या संपानंतर राज्य शासनाने सुकाणू समितीला लेखी अाश्‍वासने दिली होती. शासनाने मागण्या मंजूर करुनही अाश्‍वासने पाळली नाहीत. गेल्या आठवड्यात किसान सभेने काढलेल्या लॉंगमार्चनंतर सरकारला जाग आली व पुन्हा लेखी अाश्‍वासने देण्यात आली. मात्र, ही अश्‍वासने आता पाळवीत, यासाठी सुकाणू समितीची मंगळवारी (ता. 13) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ येथे साहेबराव करपे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाने कुटूुबासह आत्महत्या केली होती. म्हणूनच करपे कुटुंबीयांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी (ता. 19) राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर 23 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत राज्यभर "हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा' काढून स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजपर्यंतच्या विविध लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. 

राज्यात 540 सभा घेऊन ही यात्रा 27 एप्रिल रोजी पुणे येथील महात्मा फुले वाड्यात पोहचणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिल रोजी राज्यभर शेतकरी, शेतमजूर कायदेभंग करुन स्वत:ला अटक करवून घेणार असल्याचे सुभाष लोमटे यांनी सांगितले.

Web Title: Marathi News Aurngabad News Sukanu Samiti State Agitation