कठडे नसलेले पूल देताहेत अपघाताला निमंत्रण

जालिंदर धांडे
शुक्रवार, 16 मार्च 2018

बीड - शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील पुलांची दुरवस्था झाली आहे. बहुतेक पुलांचे कठडे तुटल्याने ‘कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण’ अशी स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे कठडे नसलेल्या पुलांवरून वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

बीड - शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील पुलांची दुरवस्था झाली आहे. बहुतेक पुलांचे कठडे तुटल्याने ‘कठड्याविना पूल अपघातास निमंत्रण’ अशी स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे कठडे नसलेल्या पुलांवरून वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

दोन वर्षांपासून बिंदुसरा नदीवरील बार्शी नाका येथील मुख्य पूल वाहतुकीस बंद केलेला आहे. या ठिकाणी जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम वेगात सुरू आहे. यामुळे सध्या बीड शहराला जोडण्यासाठी तीन पुलांवरून पहिल्यापेक्षा अधिक वाहतूक होत आहे; मात्र या तीन पुलांना कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. दगडी पूल हा इतिहासकालीन आहे, तर, हिरालाल चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे कठडे दोन वर्षांपूर्वीच्या महापुरात तुटले आहेत. नवीन मोंढ्याकडे जाणाऱ्या पुलाचीही अशीच अवस्था आहे. दुरुस्तीची मागणी वारंवार होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कठडे नसल्याने छोट - मोठे अपघातही घडले आहेत. मोठ्या दुर्घटनेनंतर दुरुस्ती करणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

हिरालाल चौकाकडे जाणारा पूल कठड्याविना 
शहराची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जाणारा हिरालाल चौक व जुन्या बीड शहराला (पेठ बीड) भागाला जोडणारा पूल कमकुवत आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर आलेल्या महापुराचे पाणी पुलावरून वाहिले आणि दोन्ही बाजूंचे कठडे तुटून पडले. या रस्त्यावरून नागरिकांसह विद्यार्थ्यांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. विशेष म्हणजे दोनपदरी पूल असला तरी एक बाजूनेच वाहतूक असल्याने या ठिकाणी अपघाताची मोठी शक्‍यता आहे. किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. 

दगडी पुलाचा वर्षांनुवर्षांचा प्रश्‍न
जुना बाजार भागातून कंकालेश्वर मंदिर व शहेंशाहवली दर्गा, लोणारपुरा, खडकपुरा आदी भागांना जोडणारा हा पूल आहे. इतिहासकालीन या दगडी पुलाला अनेक वर्षांपासून कठडे नाहीत. तसेच, उंची कमी असल्याने थोड्याही पावसानंतर यावरून पाणी वाहू लागल्यास वाहतूक थांबवावी लागते. तसेच, एरवी कठडे नसल्याने अपघाताची शक्‍यता आहे.

मोंढा पुलावरून  आहे मोठी वर्दळ
नवीन मोंढ्याकडे जाणाऱ्या अमरधाम स्मशानभूमीजवळील बिंदुसरा नदीवरील पुलाचे कठडेही जागोजागी तुटलेले आहेत. जुना मोंढा, नवीन मोंढा आणि औद्योगिक वसाहत भागासह लोळदगाव, कुर्ला, शिदोड आदी गावांना प्रवास करणारी वाहनेही या पुलावरून जातात. त्यामुळे पुलावरून बारमाही वर्दळ असते; परंतु कठडे नसल्याने अपघाताची शक्‍यता आहे.

Web Title: marathi news beed bridge aurangabad news