बीड जिल्ह्यात बंद; माजलगावात वाहने फोडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

शाळा - महाविद्यालये बंद
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. तुरळक ठिकाणी शाळा सुरु होत्या. तोडफोडीमुळे अनेक स्कूलरिक्षाचालकांनी घरीच थांबणे पसंद केले.

बीड : भीमा कोरेगाव प्रकरणाची धग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी बुधवारीही (ता. तीन) दिसून आली. भारीप बहुजन महासंघ व इतर संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद भेटला. बीड शहरात काही ठिकाणी दुकाने सुरु होती. मात्र, माजलगावमध्ये रात्रीच्या वेळी आठ वाहने फोडली.

भीमा कोरेगाव येथे सोमवारी अप्रिय घटनेचे पडसाद त्याच दिवशी जिल्ह्यात उमटले. सोमवारी रात्री तीन वाहने फोडली होती. तर, मंगळवारीही जिल्हाभर बंद पाळण्यात आला. शहरात बस, ट्रॅव्हल्स व दुचाकी आणि कार अशी २५ वाहने फोडल्याची घटना घडली होती. यामध्ये एक शिक्षकही जखमी झाला. तर २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बुधवारी भारीप बहुजन महासंघासह इतर संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद भेटला. बाजारपेठा बंद होत्या तर बस वाहतूकही विस्कळीत होती. 

गेवराई, परळी, केज, अंबाजोगाई, वडवणी, माजलगाव, धारुर, शिरुर, आष्टी, पाटोदासह घाटनांदूर, धानोरा आदी मोठ्या गावांतही बंद पाळण्यात आला. मंगळवारी झालेल्या तोडफोडीच्या अनुषंगाने बीडमध्ये पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून स्थानिक पोलिसांसह राखीव दलाच्याही दोन तुकड्या मागविण्यात आल्याआहेत. बाजारपेठा बंद असल्याने सामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर, वाहतूक विस्कळीत असल्याचा त्रास सामान्यांसह रुग्ण व नातेवाईंकाना सहन करावा लागला. बीडमध्ये काही ठिकाणी बाजारपेठेतील दुकाने सुरु दिसली. 

शाळा - महाविद्यालये बंद
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. तुरळक ठिकाणी शाळा सुरु होत्या. तोडफोडीमुळे अनेक स्कूलरिक्षाचालकांनी घरीच थांबणे पसंद केले.

माजलगावला आठ वाहने फोडली
मंगळवार - बुधवारच्या मध्यरात्री माजलगाव शहरातील आठ वाहने फोडल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी घरासमोर लावलेली वाहने फोडली. यामध्ये मोठे नुकसान झाले. 

Web Title: Marathi news Beed news bandh in beed