परंपरेनुसार 'येथे' निघते, जावयाची गाढवावरून सवारी !

रामदास साबळे
शुक्रवार, 2 मार्च 2018

''काही काळ याबाबत भीती निर्माण झाली होती. मात्र, जावई असलो तरी गावचाच रहिवाशी असल्याने परंपरा अखंडित राहिल्याने मला आनंद झाला''.

- महादेव घोरपडे (मिरवणूक निघालेले जावई) 

केज (जि. बीड) : निझाम काळात धुलिवंदनाच्या दिवशी या भागाचे तालुक्यातील विडा येथील तत्कालीन जहागीरदारांच्या जावयाची गदर्भ सवारी निघाली. त्यानंतर गावाने ही परंपरा म्हणून जोपासत अखंडित सुरु ठेवली. 

शुक्रवारी (ता. 2) या गदर्भस्वारीचा मान गावचेच रहिवाशी आणि जावई महादेव घोरपडे यांना मिळाला. गावभर निघालेल्या या मिरवणुकीत तरुणांसह आबालवृद्धांनी यामध्ये सहभागी होत रंगांची उधळण केली. महिलांनीही मिरवणुकीवर रंग फेकून आनंद लुटला. 

तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे विदर्भातील जावई ९० वर्षांपूर्वी ऐन धुलिवंदनाच्या दिवशी विडा (ता. केज) येथे आले होते. मालकांनी (ठाकूर आनंदराव देशमुख) पारंपरिक पद्धतीने धुलिवंदन साजरा करण्यासाठी गावातील सर्व मित्र-मंडळींना गढीवर बोलावले होते. रंगाची उधळण सुरू होती. पण याचवेळी काही तरुणांनी जावयाला उत्सवात सहभागी करून घेतले.

धूलिवंदन साजरा करत तरुणांनी जावयाला चक्क गाढवावर बसवले आणि गावातून मिरवले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे ज्येष्ठ नागरिक रामराव देशमुख (वय ८५) यांनी सांगितले. आजपर्यंत ही परंपरा अखंडित आणि विना तंटा सुरू आहे. दरम्यान, गावातील मुलींशी विवाह केलेले, नोकर किंवा व्यवसायानिमित्त सासुरवाडीत स्थिरावलेले, घरजावई अशा विडा या गावातच नेहमीच्या जावयांची संख्या दोनशेच्या घरात गेल्याने विडेकरांना बाहेर जावई वेडे असेही म्हटले जाते. मात्र, धूलिवंदन जवळ येताच ही मंडळी भूमिगत होतात. मात्र, वाटेल ते करून एक जावई हाती लावून गदर्भ सवारीची परंपरा अखंडित ठेवण्यात यश मिळवलेले आहे. एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवत नाहीत.

दरम्यान, महादेव राजेंद्र घोरपडे हे गावातीलच एकनाथ पवार यांचे जावई आहेत. अाशाबाई यांच्यासोबत सहा वर्षांपूर्वी विवाह केलेले महादेव मागचे पाच वर्षे गुंगारा मारण्यात यश मिळवत होते. यंदाही मागच्या चार दिवसांपासून त्यांचा मुक्काम शेतातच होता, पण ते बाहेर गावी गेल्याचे पत्नीसह नातेवाईक सांगत. मात्र, भावकीतल्या काहींनी महादेव शेतात पाहिले होते. त्यांनी युवकांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर गुरुवारी (ता.1) रात्रीच युवकांनी त्यांच्यावर झडप घालत पकडले. 

रात्रभर युवकांनी एक खोलीत ठेवून त्यांना सकाळी गावभर मिळविण्यात आले. या सर्वाला नकार देत जावई हाती लागल्यास सरळ गाढवावर बसतात. तसे महादेव घोरपडेही बसले. चप्पल हार घालून सजवलेल्या गाढवावर बसून ढोली - बाजा वाजवत रंगाची उधळण करण्यात आली. चार तास चाललेली मिरवणूक ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर विसर्जित झाल्यानंतर त्यांना कपड्यांचा आहेर चढवला. यामध्ये कुठलाच अपमान नसून परंपरा म्हणजेच मन आहे. 

सासरे एकनाथ पवार यांचीही निघाली होती सवारी

शुक्रवारी गदर्भ सवारी निघालेले महादेव पवार हे गावातीलच एकनाथ पवार यांचे जावई आहेत. तर त्यांचे सासरे एकनाथ पवार यांची पाच वर्षांपूर्वी अशीच सवारी निघाली होती. एकनाथ पवार हे गावातीलच मोहन घोरपडे यांचे जावई आहेत. 
 

Web Title: Marathi News Beed News Son in laws rally with Donkey