दहावी, बारावीच्या 1312 उत्तरपत्रिका जळाल्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

एवढ्या जळाल्या उत्तरपत्रिका 
- 12 वी विज्ञान (गणित) : 1199 
- दहावी उर्दू माध्यम (द्वितीय भाषा मराठी) : 104 
- इंग्रजी माध्यम (द्वितीय भाषा मराठी) : 09 
- एकूण 1312 

केज : दहावी व बारावी परीक्षेच्या 1312 उत्तरपत्रिका जळाल्याची घटना शनिवारी (ता. 3) रात्री केज येथील गटसाधन केंद्रात घडली. लॉक आणि सील केलेल्या खोलीतील उत्तरपत्रिका जळाल्याने या घटनेतून संशयाचा धूर निघत आहे. 

शनिवारी बारावी विज्ञान शाखेतील गणित विषयासह दहावी उर्दू माध्यमातील द्वितीय मराठी भाषा व इंग्रजी माध्यमाच्या द्वितीय मराठी भाषेचे पेपर होते. केज तालुक्‍यातील नऊ केंद्रांवर 12 वी विज्ञान, तर तीन केंद्रांवर दहावीच्या परीक्षा झाल्या. केंद्र संचालकांनी सर्व प्रक्रिया करून गटसाधन केंद्रात या उत्तरपत्रिका जमा केल्या. यानंतर सर्व गठ्ठे सील करून गटसाधन केंद्राच्या कस्टडी रूममध्ये या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या. यानंतर रात्री आठला कार्यालयाच्या एका खोलीतून आग आणि धूर निघत असल्याचे रात्रपाळीवरील कर्मचारी अमोल चौरे यांना दिसले. यानंतर रूम आणि गेटची चावी असलेले कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत सर्व उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. 

दरम्यान, ज्या कस्टडी रूममध्ये उत्तरपत्रिका ठेवल्या होत्या, त्या खोलीच्या खिडक्‍या व दरवाजे पूर्णतः बंद होते. गटसाधन केंद्राचा वीजपुरवठाही खंडित असल्याने शॉर्ट सर्किट होण्याचाही प्रश्‍न नाही. त्यामुळे आगीच्या घटनेतून संशयाचा धूर निघत आहे. 

एवढ्या जळाल्या उत्तरपत्रिका 
- 12 वी विज्ञान (गणित) : 1199 
- दहावी उर्दू माध्यम (द्वितीय भाषा मराठी) : 104 
- इंग्रजी माध्यम (द्वितीय भाषा मराठी) : 09 
- एकूण 1312 

Web Title: Marathi news Beed news ssc hsc answer sheet fire