वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. परदेशी यांचा नऊ नगरसेवकांसह "भाजप'मध्ये प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद, वैजापूर - वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी नऊ नगरसेवकांसह कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी (ता. 18) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वैजापुरात राजकीय भूकंप झाला आहे. 

औरंगाबाद, वैजापूर - वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी नऊ नगरसेवकांसह कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत रविवारी (ता. 18) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वैजापुरात राजकीय भूकंप झाला आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी सकाळी नऊ वाजता डॉ. दिनेश परदेशी, नऊ नगरसेवक, शंभरावर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासह डॉ. भागवत कराड, पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, उपमहापौर विजय औताडे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, ज्ञानेश्‍वर जगताप आदी उपस्थित होते. 

डॉ. परदेशी यांना सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये येण्याबाबत पक्षातर्फे विचारणा करण्यात आली होती; मात्र त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी डॉ. परदेशी यांनी भाजप पक्षश्रेष्ठीकडे प्रवेशाबाबत विचारणा केली. त्यानुसार आज पक्ष श्रेष्ठीकडून आम्हाला डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह नऊ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची यादी आली. रविवारी सकाळी श्री. दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड यांनी वैजापुरात बांधलेली कॉंग्रेसची मोट तोडण्यात भाजपला यश आले असल्याचे ते म्हणाले. 

कॉंग्रेसला मोठा धक्‍का  
वैजापूर नगरपालिका कॉंग्रेसने ताब्यात घेतली. त्यामागे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड यांच्या नियोजनाचा मोठा वाटा होता. आता वैजापूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या एक दिवस अगोदरच गुढीपाडव्याचे औचित्य साधत डॉ. परदेशी यांनी समर्थकांसह भाजपासोबत राजकीय गुढी उभारली. डॉ. परदेशी यांनी सर्वप्रथम 1991 मध्ये भाजपाच्या तिकिटावर वैजापूर नगरपालिकेची निवडणूक लढविली. त्यात विजय मिळविल्यानंतर त्यांनी 1991-95 दरम्यान उपनगराध्यक्षपद भूषविले. 2001 मध्ये नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेना-भाजपा युती असल्याने शिवसेनेने नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचाच अशी भूमिका घेतली. त्यामुळे डॉ. परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली व नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. 2001 पासून 2016 पर्यंत डॉ. परदेशी, त्यांच्या पत्नी शिल्पा परदेशी यांच्या रूपाने कॉंग्रेस पक्षाकडेच वैजापूर नगरपालिकेची एकहाती सत्ता राहिली. यंदा येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शिल्पा परदेशी यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळते काय याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: marathi news bjp congress aurangabad news marathwada