दरोडेखोरांच्या हल्ल्यात कारमालक ठार

दरोडेखोरांच्या हल्ल्यात कारमालक ठार

पाचोड - धावत्या कारवर दगडफेक करून दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात कारमालक ठार, तर चालक गंभीर जखमी झाला.  धुळे-सोलापूर महामार्गावर दाभरूळ-थापटी तांडा (ता. पैठण) शिवारात मंगळवारी (ता. १३) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी कारमालकाकडील सोन्याचे दागिगे, मोबाईल, रोकडसह एक लाख ३४ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. 

एमबी पाटील कन्स्ट्रक्‍शनचे साईट इन्चार्ज सिद्धलिंग रामलिंग कोरे (वय ५५, रा. म्हातारगाव, ता. धारूर, ह. मु. सिडको, एन- तीन, औरंगाबाद) हे कारने (एमएच- १२, एचएल- ३२५६) चालक सुनील प्रभाकर सुरडकर (३७, रा. जाधववाडी, औरंगाबाद) समवेत परळीहून औरंगाबादला येत होते. दाभरूळ-थापटी तांडा शिवारात कार येताच त्यांच्या कारवर अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे सुरडकर यांनी कार थांबविली. त्यावेळी चेहरे झाकलेल्या, डोंगराआड लपलेल्या तीन ते चार दरोडेखोरांनी कारवर हल्ला चढविला. त्यांनी कोरे, सुरडकर यांच्या गळ्याला चाकू लावून सोने, रोकड काढून द्या, अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली. नकार देताच दरोडेखोरांनी शस्त्रांनी कोरे यांच्यावर सपासप वार केले. त्यात ते गतप्राण झाले, तर सुरडकर जखमी झाले. त्यानंतर कोरे यांच्याजवळील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल असा एक लाख, ३४ हजार १५० रुपयांचा ऐवज हिसकावून दरोडेखोरांनी पोबारा केला. जखमी अवस्थेतील सुरडकरांनी कार चालवत घाटी रुग्णालय गाठले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिद्धलिंग रामलिंग कोरे यांना मृत घोषित केले. सुरडकरांवर उपचार सुरू आहेत. 

पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, फौजदार गोरक्ष खरड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत नाकाबंदी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी घाटी रुग्णालयात सुरडकरांची विचारपूस केली. पैठणच्या पोलिसांनी घटनास्थळी तपास केला, मात्र संशयितांचा माग लागला नाही. सुरडकरांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात जबरी दरोडा, खुनाचा गुन्हा दाखल झाला. महेश आंधळे तपास करीत आहेत.

यापूर्वीही घडल्या घटना
राष्ट्रीय महामार्गावर पाचोड येथे दोनवेळा जबरी दरोडे पडले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक शिक्षक ठार झाला. दोन्ही घटनांत दहाजण गंभीर जखमी झाले होते. महिनाभरापूर्वी आडूळ येथे चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडून ऐवज लांबविला. महामार्गावर दिवसा दिसणारे महामार्ग पोलिस रात्री गस्त घालताना दृष्टीस पडत नाहीत, अशी नागरिकांत चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com