...अन्यथा लोक आपल्याला जोड्याने मारतील! 

...अन्यथा लोक आपल्याला जोड्याने मारतील! 

औरंगाबाद - महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. कोण अधिकारी केव्हा येतो, केव्हाही जातो. तर कोणी दालनात हजर नसते. मागणी केल्यानंतर चार-चार महिने आम्हाला कचरा संकलनासाठी रिक्षा मिळत नाहीत, वेळेवर पथदिवे लावले जात नाहीत. मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या वसुलीची वाट लागली आहे. असाच कारभार सुरू राहिला तर महापालिका दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही आणि लोक आपल्याला जोड्याने मारतील, अशा शब्दांत महापालिकेच्या मंगळवारी (ता. १३) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी संताप व्यक्त केला. 

कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनल्यापासून महापालिकेत कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाही. एक सर्वसाधारण सभा वगळता आयुक्त २५ दिवसांत महापालिकेत आलेले नाहीत. वॉर्ड अधिकारी कचऱ्याच्या प्रश्‍नात गुंतले असल्याने मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीची वाट लागली आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य सीताराम सुरे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. माझ्या वॉर्डात कचऱ्यासाठी एक रिक्षा वाढविण्यात यावी, यासाठी मी तीनवेळी पत्र दिले. त्यानंतरदेखील वॉर्ड अधिकाऱ्यांनी मला आणखी  एक पत्र द्या, अशी विनंती केली? कशासाठी चार-चार पत्रे द्यायची? वॉर्डाचा आकार किती? वाहने किती आवश्‍यक आहेत? याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले पाहिजे; मात्र प्रत्येक प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरसेवकांनाच पुढाकार घ्यावा लागतो. तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या काळात सकाळी दहाच्या ठोक्‍याला अधिकारी कार्यालयात असत. आता एकही अधिकारी दालनात सापडत नाही. विचारणा केली असता, वसुलीला गेले, असे सांगण्यात येते. किती वसुली केली याचे आकडे घ्या, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली. कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही, त्यामुळे महापालिका दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही. तेव्हा लोक आपल्याला जोड्याने मारतील अशा संतप्त भावना श्री. सुरे यांनी व्यक्त केल्या. त्यावर सभापती गजानन बारवाल यांनी सुरे, संगीता वाघुले यांच्या वॉर्डात तातडीने रिक्षा देण्यात याव्यात, पथदिवे बसवावेत, अशा सूचना केल्या. 

आता बस्स... कृती करा 
सभापतींनी तुमच्या भावना लक्षात आल्या असे सांगून सुरे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र भावना समजून उपयोग नाही, आता बस्स झाले. कृती करा, असा टोला सभापतींना लगावला. पथदिवे बसविताना अधिकारी दुजाभाव करतात, असा आरोपही त्यांनी केला. शेजारीच वॉर्ड असलेल्या संगीता वाघुले यांच्या भागात लख्ख प्रकाश असतो, माझ्या वॉर्डाची हद्द सुरू झाली की अंधार. असे का? असे सुरे म्हणाले. 

२४६ रिक्षा तरीही संख्या अपुरी 
कचरा उचलण्यासाठी शहरात २४६ लोडिंग रिक्षा असून, त्यातील १३८ खासगी आहेत. सध्या चाळीस रिक्षा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंडित यांनी सांगितले. पैशांअभावी जेटिंग मशीन थांबल्या. महापालिकेने सहा जेटिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र अद्याप संबंधित कंपनीचे पैसे देण्यात आले नसल्याने या सहा मशीन उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यावर सभापतींनी याबाबत लेखा विभागाने तातडीने तरतूद करावी, अशा सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com