सर्वत्र माश्‍यांचा गोंगाट अन्‌ दुर्गंधी

सर्वत्र माश्‍यांचा गोंगाट अन्‌ दुर्गंधी

औरंगाबाद - शहराची कचराकोंडी तब्बल २६ व्या दिवशीही कायम असून, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १४) केलेल्या पाहणीत विदारक चित्र समोर आले. सेंट्रल नाका येथे कचऱ्याने भरलेले सुमारे पन्नास ट्रक गेल्या काही दिवसांपासून उभेच असून, तेवढाच कचरा ‘कॅनपॅक’च्या प्रक्रिया यंत्राच्या परिसरात पडून आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे, सर्वत्र माश्‍यांचा गोंगाट आहे. 

शहरात दीडशे ठिकाणी मोकळ्या जागेत महापालिकेने कचरा साठविला आहे. या ठिकाणी कुठलेही केमिकल फवारण्यात आलेले नाही, अनेक ठिकाणी कर्मचारी मास्क न वापरता धोकादायकरीत्या काम करीत असल्याचे चित्र समोर आले. दरम्यान, शहागंज, रेल्वेस्टेशन परिसरातील एसटी महामंडळाच्या जागा महापालिका ताब्यात घेणार आहे, कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून तातडीने औषध फवारणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.

महापालिका, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्तांसह मराठवाडा व राज्यातील नामांकित अधिकारी औरंगाबाद शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी कामाला लावण्यात आले आहेत; मात्र सहा दिवसांनंतरही परिस्थिती आटोक्‍यात आली नसल्याचे चित्र बुधवारी सिडको-हडको भाग वगळता शहरभर पाहायला मिळाले. महापौरांसह स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन यांनी बुधवारी पहाटेच पाहणी केली. सेंट्रल नाक्‍यावरील  स्थिती मोठी विदारक असल्याचे या वेळी समोर आले. या ठिकाणी कॅनपॅक कंपनीने सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन बसविले आहे. कचराकोंडी निर्माण झाल्यापासून या ठिकाणी मिक्‍स कचऱ्याचे ट्रक टाकले जात आहेत. त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, याच परिसरात कचऱ्याने भरलेले ५० ट्रक देखील उभे आहेत. त्यातील कचरा सडला आहे. त्यामुळे सर्वत्र माश्‍यांचा गोंगाट सुरू आहे. या ठिकाणी तातडीने बायोट्रीट औषधाची फवारणी करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. बुढीलेन भागात पदाधिकारी, अधिकाऱ्यांसमोरच एकाने कचरा पेटविला. तिथे धाव घेत अधिकाऱ्याने संबंधिताला फैलावर घेतले. आग विझवून, त्याला रस्त्यावर टाकलेला कचरा उचलण्यास भाग पाडण्यात आले. शहागंज, रेल्वेस्टेशन परिसरात एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा पडून आहेत. त्या तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

जुन्या शहरात ढीग, सिडको-हडको स्वच्छ 
जुन्या शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे, तर सिडको-हडको भाग अद्याप स्वच्छ आहे. रामनगर येथील महापालिकेच्या मोकळ्या जागेत ओल्या कचऱ्यापासून होणाऱ्या खतनिर्मितीची महापौरांनी पाहणी केली. त्यानंतर शहागंज, बुढीलेन, रोषणगेट, पैठणगेट, औरंगपुरा भाजीमंडई, किलेअर्क, सिटी चौक, पदमपुरा, रेल्वेस्टेशन परिसरात पाहणी केली. त्यात सिडको-हडको वगळता सर्वत्र कचऱ्याचे जाळलेले ढीग आढळून आले. एक-दोन ठिकाणे वगळता कुठेही औषधांची फवारणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापौरांनी जाब विचारला असता, अधिकाऱ्यांनी पावडर संपली असल्याचे, तर श्री. बारवाल यांनी पावडर पडून असल्याचे सांगितले. 

सभापतींच्या वॉर्डात  महिलांचा घेराव
पदमपुरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शेकडो टन कचरा पडून आहे. त्याला वारंवार आगी लावण्यात येत आहेत. या धुरामुळे त्रस्त झालेल्या विश्रामबाग भागातील निरुपमा शर्मा, नीता चौधरी यांच्यासह इतरांनी पदाधिकारी येताच त्यांच्याकडे धाव घेतली. सुरवातीला त्यांनी याच वॉर्डात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने श्री. बारवाल यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. त्यानंतर महापौरांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. सभागृहनेत्याने देखील मध्ये उडी घेत पदाधिकाऱ्यांचा आदर ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महिलांनी नमते घेत महापौरांची माफी मागत वॉर्डातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची मागणी केली. ही जबाबदारी विशेषाधिकारी विक्रम मांडुरके यांनी स्वीकारली. 

खड्डे खोदून पुरला  जातोय कचरा 
ओला-सुका कचरा वेगवेगळा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने सुरू केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून पडून असलेल्या हजारो टन कचऱ्याचे करायचे काय? हे कोडे अद्याप सुटलेले नाही. आता अनेक ठिकाणी खड्डे खोदून कचरा पुरला जात असल्याचे या पाहणीत समोर येत आहे.

नागरिक म्हणतात...
एखाद्या संस्थेला काम द्या

शहरात कचरा तुंबला असून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा विषय अतिशय गंभीर बनलेला आहे. राजकीय पुढारी यात राजकारण करीत असल्याची शंका येते. तुम्ही तुमचे राजकारण करा; पण लोकांना कशाला वेठीस धरता? महापालिकेला जमत नसेल तर कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांना विल्हेवाट लावण्याचे काम द्या. जी संस्था हे काम करेल त्या संस्थेने कचऱ्याची वर्गवारी करून बायोगॅस, सेंद्रिय खतनिर्मिती करून त्याची विल्हेवाट लावावी. संस्थेचे कार्य बघून लोकांमध्येही जागृती होऊन तेदेखील वर्गीकरण करून कचरा देतील. 
- अतुल शेळके

संस्थेला कचरा उचलून द्यावा
कचऱ्यामुळे सध्या शहरात वातावरण दूषित झाले आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जर एखादी मोठी संस्था कचरा उचलण्यासाठी पुढे येत असेल तर त्यांना तो उचलू द्यावा. महापालिकेने संस्थेला कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून द्यावे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून दिले तरीही महापालिका त्यावर प्रकिया करीत नाही. यासाठी वेळ पडल्यास महापालिकेने संस्थेला कर्मचारी आणि निधी देऊन मदत करावी. 
- डॉ. प्रशांत महाले

यशस्वी संस्थेला बोलवा
कचरा प्रश्‍नात स्वतः राज्य शासनाचे अधिकारी शहरात तळ ठोकून असताना शहरात ठरवून दिलेल्या ठिकाणी कचरा विघटन होताना दिसत नाही. गुपचूप कचरा डम्प करण्याचे प्रकार घडताहेत हे चुकीचे आहे. आपला कचरा सरळ बाहेर नेऊन टाकण्याची भूमिका महापालिकेची दिसते. आपण दुसऱ्याच्या दारचा कचरा आपल्या दारात सहन करीत नाही. मग जिथे डेपो बनवणार ते गावकरी तरी कसे सहन करणार. त्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया हा पर्याय आहे. महापालिका ती जबाबदारी पेलू शकत नसेल तर देशात कचरा प्रक्रिया यशस्वी करणाऱ्या संस्थेला पाचारण केले पाहिजे. 
-वर्षा बैनाडे, विद्यार्थिनी

सामाजिक संस्थेला काम द्या 
शहरात महिनाभरापासून कचऱ्याच्या प्रश्‍नाने उग्र रूप धारण केले आहे. हा प्रश्‍न गेल्या तीस वर्षांमध्ये महापालिकेला सोडवता आला नाही. प्रश्‍न चिघळल्यानंतर शासनदरबारी पोहचला, मात्र शासनही थेट भूमिका घेत नाही. त्यामुळे कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी नावाजलेल्या सामाजिक संस्थांच्या प्रस्तावांचा विचार करून कचराकोंडी सोडविली पाहिजे. 
-स्वाती खरात, शिवाजीनगर

अनुभवी त्रयस्थ बोलवा
महापालिका, राज्य शासनाचे अधिकारी अजूनही कागदोपत्री खेळ खेळत आहेत. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. देशात अनेक ठिकाणी कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया यशस्वी झाले आहेत. अशा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य आहे. हा राजकारणाचा विषय नाही. झेपत नसेल तर त्रयस्थ संस्थेला बोलवा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कचऱ्याचे व्यवस्थापन करा. त्यात लोकसहभाग गरजेचा आहे. त्यासाठी नागरिकांनाही विश्‍वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून संवादाचा सेतू उभारण्याचे काम या राजकारणी मंडळींनी करणे गरजेचे आहे.
- श्रीकांत बोरुडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com