हर्सूल तलावाने गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

औरंगाबाद - जुन्या शहरातील काही वॉर्डांची तहान भागविणाऱ्या हर्सूल तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. सध्या दीड ते दोन फूट पाणी तलावात शिल्लक असून, हे पाणी आठवडाभरच पुरेल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. आठवडाभरानंतर तलावातून कमी होणाऱ्या साडेतीन एमएलडी पाण्याची गरज जायकवाडी धरणातून भागवावी लागणार आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी वर्ष १९५४ मध्ये निजाम सरकारने हर्सूल तलाव बांधला. जायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९७५ मधील पहिली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यापूर्वी हर्सूल तलाव आणि हिमायतबागेतील शक्‍कर बावडीवरच शहरावासीयांना अवलंबून राहावे लागत होते. ५२ नहरी व हर्सूल तलावातून त्याकाळी ११.५ एमएलडी पाणी शहराला पुरविले जायचे. आजही हर्सूल तलावात मुबलक पाण्याचा साठा तयार झाल्यास शहरातील १८ वॉर्डांना रोज पाच एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाऊस असमाधानकारक झाला. त्यातच तलावाच्या वर जटवाडा व ओव्हर परिसरात जागोजागी छोटे तलाव व कोल्हापुरी बंधारे बांधले गेल्याने ते पूर्ण भरल्यानंतरच खाली तलावात पाणी येते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा तलाव एकदाही पूर्णपणे भरलेला नाही. साधारणतः १६ फुटांच्यावर पाणीपातळी गेल्यानंतरच तलावातून शहराला पाणीपुरवठा सुरू केला जातो. २८ फूट साठवण क्षमता असलेल्या  या तलावातील पाणीपातळी यंदा १९ फुटांच्यावर गेली होती. आजघडीला या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभरच येथून शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपातळी खालावल्याने सद्यःस्थितीत साडेतीन एमएलडी पाण्याचा उपसा येथून होत असून, तो हर्सूल जेलच्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात आला आहे. तलावातून पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर त्याचा ताण जायकवाडीच्या पाण्यावर पडणार आहे. त्यामुळे याचा परिणाम सिडको-हडको व जुन्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: marathi news harsul lake aurangabad news