वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूकंपाच्या धक्क्याची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

भूकंपाचा धक्का अतिसौम्य प्रकारचा असल्याने मोजता येत नसल्याचे भूकंप मापक केंद्र, लातूर यांनी कळविले आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात आज दुपारी 3:14 च्या सुमारास भूकंपाच्या अतिसौम्य धक्का जाणवल्याचे स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनास कळविले. 

सदर माहिती मिळताच जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन गावात दाखल झाले. भूकंपाच्या धक्क्याबाबत जिल्हा प्रशासनाने लातूर येथील भूकंप मापक केंद्र यांच्याशी संपर्क साधला असता भूकंपाचा धक्का अतिसौम्य प्रकारचा असल्याने मोजता येत नसल्याचे भूकंप मापक केंद्र, लातूर यांनी कळविले आहे.

या भूकंपाच्या धक्क्यामुळे गावात कुठल्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाली नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिली. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: marathi news Hingoli news Marathwada News Earthquake