हिंगोलीच्या पुष्यमित्रला उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार

पुष्यमित्र जोशी
पुष्यमित्र जोशी

हिंगोली - संगमनेर (जि. नगर) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये देशभरातील पन्नास ख्यातनाम प्राध्यापकांसमोर येथील आदर्श महाविद्यालयाचा विद्यार्थी पुष्यमित्र जोशी याने बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावण्यासाठी तयार केलेले इन्सीनरेटरचे पायलट मॉडेल कौतुकाचा विषय ठरले. त्याने सादर केलेला शोधनिबंध व पोस्टर सादरीकरणालाही जोरदार दाद मिळाली. या परिषदेत त्याने प्रथम क्रमांक िमळविला.

पुष्यमित्र राजेश जोशी हा आदर्श महाविद्यालयात बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. अकरा टक्के मृत्यू हे बायोमेडिकल वेस्टेजची योग्य विल्हेवाट न लागल्याने होतात, असे युनायटेड नेशनच्या अहवालामध्ये नमूद आहे. ते पुष्यमित्रच्या वाचनात आले. त्यावर त्याने विचार सुरू केला. या समस्येवर उपाय म्हणून त्यासाठी लागणारे इन्सीनरेटर तयार करण्याचे त्याने ठरविले. ‘आदर्श’चे प्रा. डॉ. पी. पी. जोशी, प्रा. एस. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आधी पोस्टर तयार केले. याच वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे परभणी येथे २९ व ३० डिसेंबर २०१७ मधे झालेल्या ‘आविष्कार रिसर्च’ कार्यक्रमात त्याने बायोमेडिकल वेस्ट पोस्टर तयार करून त्याची माहिती दिली. या वेळी त्याची चुणूक दिसून आली.

त्यानंतर त्याने बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी उपकरण (यंत्र) तयार करण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे सध्या बाजारात उपलब्ध असलेली इन्सीनरेटर यंत्राची किंमत किमान पन्नास लाखांच्या आसपास आहे. विजेवर चालणाऱ्या या यंत्रामुळे हवेचे प्रदूषण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुष्यमित्रने अवघ्या पाच लाख रुपयांमधे इकोफ्रेंडली मशीन तयार केले. त्यातून कार्बन डाय ऑक्‍साईडचे कन्व्हर्जन करून पाणीही तयार होते. नांदेड येथे २२ व २३ जानेवारी २०१८ ला झालेल्या ‘अन्वेशन रिसर्च कन्व्हेशन’मध्ये त्याने या संदर्भात पायलट मॉडेल तयार करून उपस्थितांची मने जिंकली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ९ व १० फेब्रुवारीला झालेल्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत त्याने सहभाग घेतला. या परिषदेत विविध देशांतील शास्त्रज्ञांचा सहभाग होता. पुष्यमित्रने या परिषदेत ‘मॅनेजमेंट ॲण्ड डिस्पोजल इन हिंगोली महाराष्ट्रा’ या विषयावर शोधनिबंध आणि पोस्टरचे सादरीकरण केले. त्याच्या या पेपरची उपस्थितांनी दखल घेत या परिषदेत त्याला उत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून गौरविले. या यशाबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर काबरा यांच्यासह सदस्यांनी त्याचे कौतुक केले.

पेटंटसाठी प्रस्तावाची तयारी
बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट लावणारे पायलट मॉडेल पाहून शास्त्रज्ञांनी कौतुक केले. विशेष म्हणजे या यंत्राद्वारे पाण्याची निर्मितीही करता येत असून त्याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार आहे. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करीत असल्याची माहिती पुष्यमित्रने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com