भाव नसल्याने थंडावली गूळ विक्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

हाळी हंडरगुळी - गुळाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गूळ विक्री करणे थांबवले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांकडे हजारो टन गूळ शिल्लक आहे. भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन गुळाचे दलाल बाजारपेठेपेक्षा कमी दरात खरेदी करत आहेत. त्यामुळे खर्चापुरता गूळ विकून शेतकरी बाकीचा गूळ बारदाना लावून ठेवत आहेत. आगामी जून महिन्यात भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी गूळ विक्रीविना साठवून ठेवला आहे. 

हाळी हंडरगुळी - गुळाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गूळ विक्री करणे थांबवले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांकडे हजारो टन गूळ शिल्लक आहे. भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन गुळाचे दलाल बाजारपेठेपेक्षा कमी दरात खरेदी करत आहेत. त्यामुळे खर्चापुरता गूळ विकून शेतकरी बाकीचा गूळ बारदाना लावून ठेवत आहेत. आगामी जून महिन्यात भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी गूळ विक्रीविना साठवून ठेवला आहे. 

हाळी हंडरगुळी, शिवणखेड, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, वाढवणा (खु.), सुकणी हा परिसर गूळ उत्पादनात अग्रेसर आहे. तिरू मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावर शेकडो हेक्‍टर जमीन ही ओलिताखाली येते. यामुळे या भागातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा कारखान्याने उसाला योग्य भाव दिला. तरीही शेतकऱ्यांनी उसाचे गाळप करणे शेतकऱ्यांनी पसंत केले. आताही या भागात गुऱ्हाळे सुरूच आहेत. अजुन एक महिना ती सुरूच राहणार आहेत. या भागात गुळाचे उत्पन्न जास्त असल्याने येथे जालना, जळगाव, नांदेड, लातूर, बीड येथील व्यापारी थेट गुऱ्हाळावर किंवा घरी येऊन गूळ खरेदी करतात. 

एक महिन्यापूर्वी तीन हजार ते बत्तीशे रुपये प्रतिक्विंल भाव होता. येत्या पंधरा दिवसांत क्विंटलमागे सातशे रुपये भाव कमी होऊन दोन हजार 400 ते 2 हजार 600 रुपयांप्रमाणे गुळाची विक्री होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आगामी काळात गुळाचे भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी खर्चापुरता गूळ विकून बाकी बारदाना लावून साठवून ठेवला आहे. काही सधन शेतकरी इतर शेतकऱ्यांचा गूळ खरेदी करून साठवून ठेवत आहेत. या भागातील चिमाचीवाडी 100 टन, शिवणखेड येथे 200, हाळी हंडरगुळीत 50, मोरतळवाडी 40, सुकणी 60, आडोळवाडी 30, वाढवणा (खु.) 30 असा एकूण जवळपास पाचशे टन गूळ शिल्लक आहे. 

गुळाचा रंग बदलू नये व त्यास पाणी सुटून तो खराब होऊ नये यासाठी गुळाला बारदाना लावण्याचे काम सुरू आहे. शेकडा पाचशे रुपयांप्रमाणे बारदाणा लावण्यात येत आहे. बारदाना लावण्यासाठी लातूर, नांदेड येथील मजूर या ठिकाणी येतात. एक मजूर दिवसात तीनशे गुळाच्या डागांना बारदाना लावण्याचे काम करतात. 

दलालांच चांगभलं...! 
जालना, नांदेड, लातूर, जळगाव येथील व्यापारी दलालांमार्फत गूळ खरेदी करतात. व्यापाऱ्यांकडून दलालांना किंवटलमागे दहा रुपये कमिशन दिले जाते. गुळाचे भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन काही दलाल बाजारपेठेपेक्षा कमी दरात गूळ खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. क्विंटलमागे साठ ते सत्तर रुपयांची गल ठेवून दलाल खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. या व्यवहारात दलालांचं चांगभलं होत आहे. 

सारा खेळ आशेचा 
एक महिन्यापूर्वी गुळाचा भाव प्रतिक्विंटल तीन हजार ते बत्तीशे रुपये होता. बाजारपेठेत आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. कमी दरात गूळ विकणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. येत्या दोन-तीन महिन्यांत गुळाचे भाव वाढतील या आशेने गुळाला बारदाना लावून ठेवला असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. 

Web Title: marathi news jaggery marathwada farmer