व्यापाऱ्याला मारहाण करून साडेपाच लाखांचा ऐवज लुटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू यांच्यासह त्यांची पत्नी सुषमा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू यांच्यासह त्यांची पत्नी सुषमा यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आडत व्यापारी विनोद गुलबाचंद जाजू यांच्या घरात मंगळवारी पहाटे गच्चीवरून दोन चोरट्यांनी प्रवेश केला, विनोद यांच्या पत्नी सुषमा जाजू या वेळी जाग्या झाल्या. समोर तोंड बांधलेले दोन चोर दिसल्याने त्या घाबरल्या, या वेळी आरडाओरड केल्यास मारून टाकण्याची धमकी चोरट्यांनी दिली. त्यामुळे घाबरलेल्या सुषमा जाजू यांनी त्यांच्या अंगावरील पोत, हातातील बांगड्या, अंगठी चोरट्यांच्या स्वाधीन केले. तितक्‍यात विनोद जाजू यांना जाग येताच चोरट्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या कानावर वार केला, त्यात जाजू जखमी झाले. त्यानंतर अंगठी, बांगड्या व पोत घेऊनही समाधान न झाल्याने चोरट्यांनी सुषमा जाजू यांना सोबत घेऊन घरातील कपाट, स्वयंपाकघर व अन्य ठिकाणची पाहणी केली. या वेळी त्यांना एक लाख रुपये कपाटात दिसले. ही रक्‍कम घेतल्यानंतर चोरटे ‘आम्ही बाहेर जाईपर्यंत आरडाओरड केल्यास ठार मारू’ अशी धमकी देत तेथून पसार झाले. सकाळी सहा वाजता ही माहिती गावात पसरली.

व्यापाऱ्यांकडून सावंगी चौकात रास्ता रोको
व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या निषेधार्थ बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात रास्ता रोको केला. तब्बल तीन ते चार तास रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्यासह मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता. 

तीन महिन्यांतील सहावी घटना
या जबरी चोरीच्या घटनेने ग्रामस्थ, व्यापारी संतप्त झाले असून तीन महिन्यांत आतापर्यंत दरोडा, चोरीची ही सहावी घटना आहे. एकाही घटनेतील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नसून ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news lasur station news loot crime