लातुरात कचऱ्यापासून प्रभागातच खत निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

लातूर - सध्या मोठ्या शहरांतील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावर आपल्या प्रभागातील कचरा आपल्याच प्रभागात कुजवून त्याची खतनिर्मिती करणे हाच उपाय सध्यातरी दिसत आहे. मराठवाड्यातील पहिला यशस्वी प्रयोग लातूरच्या प्रभाग पाचमध्ये काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केला आहे. यासाठी तीस पीट तयार करण्यात आले असून दररोज पाच हजार कुटुंबीयांच्या तीन टन कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे.

प्रभाग पाचमध्ये पाच हजार कुटुंबीय आहेत. या प्रभागात कचरा गोळा करण्यासाठी सात घंटागाड्यांचा वापर केला जात आहे. प्रत्येक घंटागाडी दोन फेऱ्या मारून प्रभागातील सुमारे तीन टन कचरा रोज गोळा करीत आहे. या सर्व कचऱ्याचे प्रभागातच ओला व सुका कचरा असे वर्गीकरण केले जात आहे. प्रभागातील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातच कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी तीस दिवसांचे तीस पीट (रकाने) तयार करण्यात आले आहेत. तीन टन कचरा बसेल एवढी क्षमता या प्रत्येक पीटची आहे. 

एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करूनही कचऱ्याचे प्रश्न मिटत नाहीत हे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण येथे मात्र महापालिकेला एक पैसाही खर्च करावा लागलेला नाही. या प्रभागाचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी या प्रकल्पाचा पूर्ण भार उचलला आहे. इतकेच नव्हे, तर कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी लोकांचा सहभाग वाढावा म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले.

शास्त्रोक्त पद्धतीने खत निर्मिती
तीस पीटच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. पीटमधील कचऱ्यावर जीवाणू मिश्रण फवारले जाते. त्यानंतर काळ्या मातीचा थर दिला जात आहे. त्यावर दुर्गंधी येणार नाही यासाठी एका औषधाची फवारणी केली जाते. त्यामुळे कचऱ्याने भरलेल्या या पीटच्या जवळ गेले तरी दुर्गंधी येत नाही.

 मराठवाड्यातील पहिला प्रयोग यशस्वी
 पाच हजार कुटुंबीयांच्या कचऱ्यावर प्रक्रिया
 प्रभागातच कचऱ्याचे वर्गीकरण
 नगरसेवकाने केला सर्व खर्च

कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प उभारला. लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे. दररोज तीन टन कचऱ्यापासून शास्त्रोक्त पद्धतीने खत तयार करीत आहोत. सुरवातीला प्रभागातील बगीचा तसेच नागरिकांना घरातील कुंड्यांसाठी हे खत मोफत दिले जाईल. त्यानंतर त्याची विक्री केली जाणार आहे. त्यातून प्राप्त निधी प्रभागातील स्वच्छतेवर खर्च करू. या प्रकल्पासाठी केवळ एकच कर्मचारी व्यवस्थापन करीत आहे.
- विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक, प्रभाग पाच, लातूर

Web Title: marathi news latur news garbage fertilizer generation