छावाच्या कार्यकर्त्यांची एसटी बसवर दगडफेक 

अनिल जमधडे 
सोमवार, 18 डिसेंबर 2017

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर वादळ निर्माण केले, मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी 59 मोर्चे काढून लोकशाही मार्गाने निषेध करुनही सरकार दखल घेत नाही. त्यामुळे या विरोधात छावाच्या कार्यकर्त्यांनी सोमवार (ता. 18) रस्त्यावर उतरुन एसटी बसवर दगडफेक केली.

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर वादळ निर्माण केले, मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी 59 मोर्चे काढून लोकशाही मार्गाने निषेध करुनही सरकार दखल घेत नाही. त्यामुळे या विरोधात छावाच्या कार्यकर्त्यांनी सोमवार (ता. 18) रस्त्यावर उतरुन एसटी बसवर दगडफेक केली.

मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर 59 मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. असे असतानाही न्याय मिळत नाही. याबद्दल जाब विचारण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप करुन छावा संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी शहरात जालना रस्त्यावर राज पेट्रोलपंपासमोर अक्कलकोट-औरंगाबाद-चाळीसगाव ही बस (क्र. एमएच-20-बीटी-2359) बसगाडी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास आडवली. त्यानंतर हातातील काठीने आणि दगडांनी बसची समोरची काच फोडली. ही बस चाळीसगाव आगाराची असून, सिडको बसस्थानकातून मुख्य बसस्थानकाकडे जाण्यासाठी निघाली असताना, तीला लक्ष करण्यात आले. 

कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर "महाराष्ट्र सरकारची दादागिरी, निषेध निषेध निषेध' अशी पत्रके भिरकावून पलायन केले. मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही समन्वयकास अटक केली तर राज्यात कुठेही बस फिरु देणार नाही, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण, स्वामीनाथन आयोग, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अशा ज्या मागण्या आहेत, त्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्री व आमदारास फिरु देणार नाही असा इशारा पत्रकात दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक गोरख चव्हाण घटनास्थळी धावले. त्यामुळे कार्यकर्ते पळून गेल्याने अन्य वाहने त्यांना फोडता आली नाही.

Web Title: marathi news local chava sanghatana aurangabad news