आंदोलनात ग्रामपंचायतीला टाळे ठोकले; आता किल्लीच सापडेना!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

वालसावंगी : येथील ग्रामपंचायत कार्यालयाला लावण्यात आलेले कुलूप रविवारी (ता. 24) तिसऱ्या दिवशीही उघडण्यात आले नव्हते. दरम्यान, या प्रकारामुळे गावातील दैनंदिन कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे ठोकलेल्या कुलुपाची चावी सापडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

वालसावंगी : येथील ग्रामपंचायत कार्यालयाला लावण्यात आलेले कुलूप रविवारी (ता. 24) तिसऱ्या दिवशीही उघडण्यात आले नव्हते. दरम्यान, या प्रकारामुळे गावातील दैनंदिन कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे ठोकलेल्या कुलुपाची चावी सापडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

दारूबंदीबाबत शुक्रवारी (ता. 22) ग्रामपंचायतवर शेकडो महिला जमल्या. मात्र प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सरपंच किंवा ग्रामविस्तार अधिकारी यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. त्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षाविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर हे कुलूप प्रकरण शांत होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती, मात्र तसे काही घडले नाही व सलग तिसऱ्या दिवशीदेखील ग्रामपंचायतला महिलांनी लावलेले कुलूप उघडलेच नाही. 

गेली चावी कुणीकडे... 
संतप्त महिलांनी कुलूप लावले खरे मात्र कुलुपाची चावी गेली कुणीकडे हे मात्र कळेनासे झाले आहे. सरपंच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार यांच्याकडे चावी असल्याचे सांगत आहेत. तर श्री. पवार हे चावी महिलांकडे असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे नेमकी चावी गेली कुणीकडे असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. जोपर्यंत चावी मिळत नाही आणि मिळाली तरी पोलिसांच्या समक्ष कुलूप उघडू, तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे. या प्रकाराने ग्रामस्थ वैतागले आहेत. 

घंटागाडी फेरी, पाणीपुरवठा बंद 
कार्यालयास कुलूप ठोकलेले असल्याने ग्रामपंचायतनेदेखील आडमुठेपणाची भूमिका घेत कामेच खोळंबून टाकली आहेत. गावाचा केरकचरा नियमितपणे वाहणारी घंटागाडीदेखील दोन दिवसांपासून बंद ठेवली आहे. पाणीपुरवठादेखील दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

Web Title: marathi news marathi websites Aurangabad News marathwada