भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून गळती

भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून गळती

राजूर : भंडारदरा धरणाच्या व्हाॅल्व्हला सुरू असलेली गळती अनेक वर्षांत जलसंपदा विभागाला पूर्णपणे थांबविता आलेली नसतानाच आता धरणाच्या सांडव्यापासून लोखंडी ओहरफ्लो गेट (स्पीलवे) गळती सुरू झाली असून धरण शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांनी या गळतीला दुजोरा दिला आहे.

नव्यानेच बांधकाम केलेल्या सांडव्याच्या भिंतीला गळती लागल्याने रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. त्यामुळे केलेल्या बंधकांचीच शंका येत असल्याने या बांधकामाची चौकशी करून गळती थांबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जलसंपदाचे काम म्हणजे आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते अशी असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

धरणाच्या अंब्रेलाफाॅल व 150 च्या व्हाॅल्व्हमधून सद्यस्थितीत पाण्याची गळती सुरू आहे. ही गळती थोपविण्याचे प्रयत्न जलसंपदा विभागाने अनेकदा करुन पाहिले; मात्र गळती थोपविण्यात विभागाला यश आले नाही. त्यामुळे ही गळती आजही दुर्लक्षित आहे. केवळ 100 च्या व्हाॅल्व्हमधून होणारी गळती मात्र थांबविली आहे. पण आता धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना धरणाच्या सांडव्यापासून लोखंडी ओव्हरफ्लो गेटपासून देखील गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात काहीही घडू शकते. या गळतीद्वारे साधारण 24 तासात किमान 10 ते 15 क्युसेक्सने पाण्याची गळती सुरु आहे. याबाबत धरण शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा देत यावर्षी अधिक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने लवकर भरले. त्यामुळे ओव्हरफ्लो गेट जास्त वेळा ऑपरेट करावे लागल्याने घर्षणाने गॅप पडतो. रबरसीलला गाळा पडतो रबरसील कालबाह्य झाले असून निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत काम करणे सोयीचे होत नाही, असे सांगितले. तर 200 च्या व्हाॅल्व्ह दुरुस्ती पाहणी करण्यासाठी नाशिक यांत्रिकी विभाकाकडून तज्ञ आले असून त्यांना स्पीलवे ओव्हरफ्लो गेटची पाहणी करण्यासाठी सांगितले असून वरिष्ठांना देखील तातडीने कळवणार असल्याचे सांगितले. मात्र धरणाच्या व्हाॅल्व्ह दुरुस्तीचे घोंगडे भिजत असताना सांडव्याची गळतीची दुरुस्ती केव्हा होणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

या धरणाच्या लाभ क्षेत्रात विरोधी पक्षनेते व तीन वजनदार आमदार एक खासदार आहेत हे पाण्यासाठी व आवर्तनासाठी ईर्षा करतात; मात्र व्हाॅल्व्ह गळती किंवा इतर समस्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 11039 दलघफुट पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणात आज पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आज चिंगारीच्या स्वरूपात असलेली गळती भविष्यात उग्ररुप धारण करण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे .त्यामुळे स्पिलवे जवळील गेट धोकादायक मार्गावर आले असून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे लाभक्षेत्रातील नेते मंडळी यांनी धारण परिसराला भेट देऊन याची पाहणी करून सरकारला अहवाल देणे आवश्यक आहे .

मात्र वैयक्तिक विषय घेऊन विधानसभेत आवाज उठविणारे लोकप्रतिनिधी याबाबत गप्प का असा सवाल परिसरातील जनतेने विचारला आहे.

गळती ही रबरसील खराब झाले असल्याने होत असून यांत्रिकी विभाग व मी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.पाणीपातळी कमी होताच तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com