वासाने घास गिळणेही अवघड

रविवार, 11 मार्च 2018

औरंगाबाद - शहरात कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या आता दुर्गंधी आणि रोगराईला पोसणाऱ्या ठरू लागल्या आहेत. या कुंड्यांचेच अघोषित डेपो झाल्याने या कचऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीने घरात घास गिळणेही अवघड झाले आहे. कुणीही येतो अन्‌ कचरा पेटवून देत असल्याने होणाऱ्या धुराचा श्‍वसनाला त्रास होत असल्याच्या वेदना कचरा कुंड्यांलगतच्या घरांमधून ऐकू यायला लागल्या आहेत. 

औरंगाबाद - शहरात कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुंड्या आता दुर्गंधी आणि रोगराईला पोसणाऱ्या ठरू लागल्या आहेत. या कुंड्यांचेच अघोषित डेपो झाल्याने या कचऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीने घरात घास गिळणेही अवघड झाले आहे. कुणीही येतो अन्‌ कचरा पेटवून देत असल्याने होणाऱ्या धुराचा श्‍वसनाला त्रास होत असल्याच्या वेदना कचरा कुंड्यांलगतच्या घरांमधून ऐकू यायला लागल्या आहेत. 

लहान कुंड्यांलगत साचलेला भलामोठा कचरा आता शहराच्या अनेक भागांत रोगाराईचा पोषिंदा ठरू लागला आहे. कचरा उचलला जात नसल्याने साठलेल्या या कचऱ्या भोवतीच्या रहिवाशांना याचा त्रास व्हायला लागला आहे. २२ दिवसांपासून साचलेल्या या कचऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे घरात घास गिळणे अवघड झाल्याची प्रतिक्रीया रोशनगेटलगत असलेल्या कुंडीशेजारी राहणाऱ्या लोकांनी व्यक्त केली. वाऱ्याच्या दिशेने कचऱ्यातून येणारी दुर्गंधी तीव्र होत असून त्यामुळे घरातील सदस्यांची प्रकृतीही बिघडत असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. 

फवारणी नाही, कचरा जाळला
रोशनगेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीसह अचानक कचरा पेटवल्याने धुरामुळे अचानक कोंडी सोसावी लागली. शहरात कचरा उचलण्याची अडचण असल्याने तो पडून राहण्याला आक्षेप नाही, परंतु त्यावर किमान फवारणी करून लोकांच्या प्रकृतीला होणारा त्रास थांबवण्याचे प्रयत्नही केले जात नसल्याने हा त्रास अधिक वाढत आहेत. फवारणी न करता कचरा जाळला जात असल्याने जमिनीवरील कचरा घटलेला दिसतो; पण तो हवा अशुद्ध करत असल्याने श्‍वास घ्यायला त्रास होत आहे. 
दुसरीकडे कचरा असलेल्या परिसरात डासांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्‍त केल्या. कचरा वाऱ्याने उडून घरात येतो. त्यावर बसणाऱ्या माशा दिवसरात्र त्रास देत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. पहाटे घराबाहेर पडताना कुत्र्यांच्या भांडणातून वाट काढावी लागतात. अनेकदा कुत्रे उडत आलेल्या कचऱ्यावर ताव मारण्यासाठी गल्ल्यांमध्ये शिरत असल्याने लहान मुलांचे खेळणेही धोक्‍याचे बनले आहे. 

रात्री झोप लागेना 
कुत्र्यांचा गोंधळ, साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी आता रात्री झोपू देत नाही. हवेमुळे पिशव्या घरात, गल्लीत आणि परिसरात उडुन येतात. सकाळी उठून घराबाहेर पडतानाचा त्रास शब्दांत सांगता येत नाही. कुत्र्यांची दहशतही वाढली असून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. 
- सय्यद हसनोद्दीन, रहिवासी, रोशनगेट

घरातील सदस्य आजारी 
गल्लीलगत असलेला कचरा उचलला जात नसल्याने घरात आजारपण फोफावू लागले आहे. वास असल्याने घरात घास गिळणे अवघड झाले आहे. महापालिकेने किमान फवारणी करावी, कचरा जाळण्याचा आडमुठेपणा करू नये. 
- फिरोज खान, रहिवासी, रोशनगेट

Web Title: marathi news marathwada garbage health