कसला 'आधार'! आम्ही तर वडीलोपार्जित निराधार

राजेभाऊ मोगल 
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

आधारकेंद्रावर नोंदणीसाठी गेलो की ते अधिकृत रहिवासी पुरावा मागतात; मात्र भटके कुठून रहिवासी पुरावे द्यायचे. त्यामुळे माझे वय 22 वर्ष झाले तरी मला आधार नोंदणी करता न आल्याने आधारकार्डपासून वंचित राहिलो. 
- अजय पवार, कामगार

औरंगाबाद : ना जमीन, ना नियमित रोगजार आम्ही तर वडीलोपार्जित अशिक्षित बेरोजगार, अशी अवस्था आजही भटक्‍यांची आहे. आपण प्रगतीच्या बाता मारत असताना आजही समाजातील काही वर्ग एकवेळच्या जेवणासाठी कष्ट उपसत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ तर दूरच साधे आधार कार्डही यांच्यापर्यंत पोचले नसून कसले "आधार' आम्ही तर निराधार अशा शब्दांत ते दु:ख मांडतात. 

समाजातील प्रत्येक घटक आहे शिक्षणाच्या प्रवाहात यायला हवा. यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यापासून शासन, सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत; मात्र आजही उपेक्षिताना मुख्य प्रवाहात आणणे शक्‍य झालेच नाही. त्यामुळे शासनाच्या योजना, घोषणा या त्यांच्यापासून कोसो दूरच आहेत. रस्त्याच्या कडेला पाल उभारत घर थाटायचे, मिळेल ते काम करून त्यामोबदल्यात मिळालेल्या पैशात गुजरान करायची, हे जन्माला आल्यापासून ठरलेलेच. त्यामुळे आजही भटके, पारधी, शिकलकरी यांच्यासह उपेक्षित मंडळी भाकरीच्या शोधात फिरताना पाहायला मिळत आहेत. 

शहरातील गजानन महाराज मंदिर ते सेव्हनहिल रस्त्यावर डाव्याबाजूला गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ हातवर पोट असणारी कष्टकरी आहेत. त्यांनी रस्त्याच्या कडेला पाल टाकून आपला संसार थाटला आहे. पस्तीसी ओलांडलेले संजय पवार म्हणतात, "सकाळ झाली की वडीलोपार्जित पाटा, वरवंटा, देवांच्या दगडी मूर्ती, छोटी मंदिरे, पोळपाट निर्मितीला सुरवात होते. हाताला घट्टे पडतात. मगच देवदेवतांच्या मूर्तींना प्रत्यक्षात आकार येतो. त्यानंतर त्यास विकत घेणारा आला तरच देव पावला असे म्हणता येते; मात्र कधीकधी दिवसभरात बोहणीही होत नाही'', अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली. 

पोळपोट बनविणाऱ्या चंदाबाई किशोर घोरपडे म्हणाल्या, "बॅंकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड लागते; मात्र रहिवासी असल्याचाच पुरावा मिळत नाही. मग बाकीच्या गोष्टी कशा करायच्या, असा प्रश्‍न उभा राहतो. आमच्यासाठी शासनाच्या नेमक्‍या कोणत्या योजना आहेत, याची साधी माहितीही आम्हाला नाही.'' त्यामुळे शासनाच्या योजनांचा हेतू सफल होऊ शकला नाही, असे स्पष्ट होते. एक तर ही मंडळी योजनांची माहिती मिळेल, तिथे पोचू शकलेली नाही. दुसरे म्हणजे शासनही त्यांच्या दारापर्यंत जाऊ शकलेले नाही. त्यामुळे अजूनही उपेक्षित मुख्य प्रवाहात येऊच शकले नाहीत. 

आधारकेंद्रावर नोंदणीसाठी गेलो की ते अधिकृत रहिवासी पुरावा मागतात; मात्र भटके कुठून रहिवासी पुरावे द्यायचे. त्यामुळे माझे वय 22 वर्ष झाले तरी मला आधार नोंदणी करता न आल्याने आधारकार्डपासून वंचित राहिलो. 
- अजय पवार, कामगार

Web Title: Marathi news Marathwada news aadhar card