शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात महापालिका अपयशी

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

तारखेचा घोळ घालाल तर निवडणुकीत जागा दाखवू 
छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारच जयंती साजरी व्हावी, ही तमाम शिवभक्‍तांची भावना आहे. मात्र, जे नेते, पदाधिकारी तारखेनुसार शिवजयंती साजरी करणार नाहीत, त्यांना आगामी निवडणुकीत शिवभक्‍त जागा दाखवतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय  महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सहा वर्षापूर्वी घेतला होता. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी बुधवारी केला. 

दरम्यान, येत्या दोन दिवसांत लेखी उत्तर द्यावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय घेऊ, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. 
याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील म्हणाले, की सध्या या पुतळ्याची उंची ही 25 फूट आहे. मात्र, आजूबाजूने उड्डाणपूल गेल्याने पुतळा झाकला जात आहे. 19 जानेवारी 2013 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंचु, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

यासंदर्भात महापालिका आयुक्‍तांना बुधवारी निवेदन सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना पाटील म्हणाले की, निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही, हे जनतेसमोर यायला हवे, त्यामुळे पुतळ्याची उंची वाढविण्याबाबत आपली भूमिका दोन दिवसांत लेखी स्वरूपात द्यावी. या विश्‍वाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबदद्दल होणारा हा दुर्लक्षितपणा शिवभक्‍त सहन करणार नाहीत. जर उंची वाढविण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसतील तर दोन दिवसांत स्पष्ट करावे. शिवजयंती महोत्सव समिती स्वखर्चाने काम करेल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. एक तर आम्हाला नाहरकत प्रमाणपत्र द्यावे अन्यथा काम सुरू करावे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

पत्रकार परिषदेस शिवजयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक राजू शिंदे, अभिजित देशमुख, अनिल मानकापे पाटील, अतिक मोतीवाला, मनोज गायके, सुनील मगरे, तनसुख झांबड, संदीप शेळके, विनोद बनकर, दत्ता भांगे, अप्पासाहेब कुढेकर, रवींद्र काळे, रमेश केरे, नवीन ओबेराय, गजानन पाटील, रमेश गायकवाड, गोकुळ मलसे, विजय काकडे, बाळासाहेब औताडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: marathi news marathwada news chhatrapati shivaji maharaj