वडिलांच्या निधनाने खचून न जाता दिली परीक्षा

अविनाश काळे
बुधवार, 14 मार्च 2018

वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत लक्ष्मी दुधभाते हीने परीक्षा दिली आणि त्यानंतर दुपारी वडिलाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिली.

उमरगा - घरची आर्थिक परिस्थिती बेताची, शिक्षण शिकण्याची मोठी जिद्द बाळगुन दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी दुधभाते हीने वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत बुधवारी (ता. 14) शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रात विज्ञान विषयाची परीक्षा दिली आणि त्यानंतर दुपारी वडिलाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिली. तालुक्यातील त्रिकोळी येथील रहिवाशी असलेली लक्ष्मी दिंगबर दुधभाते ही गावातीलच स्वामी विवेकानंद विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेते.

लक्ष्मी अभ्यासात तशी हुशार, मात्र कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. आई-वडील, दोन भाऊ असे कुटुंब. शेळ्या राखून उदरनिर्वाह करणारे दिगंबर दुधभाते यांना वडिलोपार्जित सहा एकर शेतजमीन असून, त्यातून निघालेले उत्पन्न व शेळीपालनातून वडिलाने मुलांचे शिक्षण सुरू ठेवले होते. मोठा मुलगा अकरावीत, मुलगी लक्ष्मी दहावीला तर लहान मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती नाजूक असतानाच तीन महिन्यांपूर्वी दिंगबरच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र मंगळवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. कुटुंबकर्त्या वडिलाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले. बुधवारी विज्ञान विषयाचा (भाग- एक) पेपर असल्याने मंगळवारी रात्री दुःखाश्रू पचवत लक्ष्मीने अभ्यास केला अन् बुधवारी सकाळी साडेनऊला शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून तिने विज्ञान विषयाचा पेपर सोडवला. दुपारी एक वाजता ती वडिलांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांसमवेत त्रिकोळीला गेली. गावातील प्रतिष्ठीत मान्यवर आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दिगंबर दुधभाते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अन् शिक्षकांचेही डोळे पाणावले
वडिलांच्या निधनानंतरही दहावी परीक्षेची संधी न गमविण्याचा लक्ष्मीने केलेल्या निर्धाराचे शिक्षकांनी कौतुक करून परीक्षेला केंद्रावर आलेल्या लक्ष्मीला केंद्रसंचालक नेताजी गायकवाड, जिल्हा परिषदेचे शिक्षक रघुवीर आरणे यांनी धीर दिला. विस्तार अधिकारी (शिक्षण) शिवकुमार 
बिराजदार यांनीही लक्ष्मीच्या धैर्याचे कौतुक केले. दरम्यान, लक्ष्मीने दहावीचे उर्वरित चार विषयांची परीक्षा चांगला अभ्यास करून देण्याचा निर्धार केला आहे. वडिलांनी शिक्षण घेण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे या पुढील काळातही शिक्षण घेणार असल्याचे तिने सांगितले.

Web Title: marathi news marathwada scholar girl father passes away exam