‘आयपीएस’ अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

नांदेड - तीन महिन्यांपूर्वी पदभार घेतलेले नांदेड शहरातील इतवारा उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक जी. विजयकृष्णा यादव यांच्यावर अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेडमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास कारवाई केली. एक लाख रुपये घेणाऱ्या त्यांच्या एका खासगी व्यक्तीला त्यांच्या सांगण्यावरून नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या न्यू पंजाब नावाच्या ढाब्यावर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मूळचे हैदराबादमधील (तेलंगण) रहिवासी असलेले आयपीएस जी. विजयकृष्णा यादव हे सध्या इतवारा पोलिस उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते या ठिकाणी येण्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिस ठाण्यात परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्या काळात एका बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स व वाळू वाहतूक कंत्राटदाराचा ट्रक पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात जप्त केलेला ट्रक लवकर सोडून द्यावा व न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यासाठी दोन लाखांची लाच जी. विजयकृष्णा यादव यांनी मागितली होती. त्यानंतर त्यांची इतवारा पोलिस उपविभागात बदली झाली होती. येथे पदभार घेतल्यानंतरही ते संबंधित वाळू कंत्राटदाराना फोनवर पैशाची मागणी करीत होते. 

संबंधित कंत्राटदारांने अमरावती एसीबीमध्ये तक्रार दाखल करून लगेच त्या पथकाला मंगळवारी सोबत घेऊन नांदेड गाठले; परंतु यादव हे बाहेरगावी असल्याने कंत्राटदाराने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ‘मी एक लाख रुपये घेऊन आलोय, आपण कुठे आहात,’ असे विचारले. या वेळी त्यांची खासगी व्यक्ती येथील व्यापारी सन्नीसिंग इंदरसिंग बुंगई (रा. बाबा दीपसिंगनगर, भगतसिंग रोड, नांदेड) यांच्याकडे देण्यास सांगितले. या वेळी सन्नीसिंग हा अर्धापूर रस्त्यावर एका ढाब्यावर होता. त्याने त्यांना तिकडे बोलावून घेतले व एक लाख रुपये स्वीकारले. त्यानंतर जी. यादव यांना त्यांनी पैसे मिळाल्याचे कळविले. या वेळी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी सन्नीसिंगला अटक केली. तर दुसऱ्या पथकाने जी. यादव यांच्या तेलंगणातील निवासस्थानावर छापा टाकला. 

Web Title: marathi news nanded news IPS officer ACB bribe case