पोलिसाच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

निलंगा - पोलिसाने केलेल्या मारहाणीनंतर बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या मुलासह नातेवाइकांनी केली आहे.

निलंगा - पोलिसाने केलेल्या मारहाणीनंतर बेशुद्ध पडलेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या मुलासह नातेवाइकांनी केली आहे.

चिंचोडी (ता. निलंगा) येथील शेतकरी पांडुरंग मार्तंड (वय ६५) हे सात मार्चला आजारी विवाहित मुलीला भेटण्यासाठी येथे आले होते. मुलीच्या भेटीनंतर दुपारी गावाकडे परतण्यासाठी निलंगा स्थानकात ते बसच्या प्रतीक्षेत होते. त्या वेळी तेथे आलेल्या पोलिस कर्मचारी नामदेव कोळी यांनी पांडुरंग मार्तंड यांना काठीने जबर मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध होऊन कोसळले. बसस्थानकातील प्रवाशांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना लातूरला हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पांडुरंग यांच्या नातेवाइकांनी घटनेची माहिती निलंगा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्याण सुपेकर यांना दिली आणि मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या वेळी पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करता मारहाण करणाऱ्या कोळींना बोलाविले व जखमीवर लातूर रुग्णालयात नेऊन  उपचार करण्यास सांगितले. पांडुरंग यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात सोडून कोळी तेथून गायब झाले. चार दिवसांच्या उपचारानंतर चिंचोडीतील घरी आलेल्या पांडुरंग मार्तंड यांचा सोमवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. संतप्त नातेवाईक, ग्रामस्थांनी निलंगा पोलिस ठाण्यात मृतदेह आणला. मारहाण करणाऱ्या पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत या सर्वांनी ठिय्या मांडला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोद केली आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. पांडुरंग यांचा मुलगा राम मार्तंड यांनी कोळीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.

या घटनेची सविस्तर माहिती घेऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी करू.
- कल्याण सुपेकर, निरीक्षक, निलंगा पोलिस ठाणे.

Web Title: marathi news police farmer crime aurangabad news