रेल्वे बोगी कारखान्यामुळे पंधरा हजार तरुणांना मिळेल रोजगार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

निलंगा - लातूरसाठी मंजूर झालेल्या केंद्रातील रेल्वे बोगी कारखान्यामुळे मराठवाड्यातील तरुणांची रोजगाराची समस्या सुटणार असून, पहिल्याच टप्प्यात पंधरा हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचा विश्वास कामगार कौशल्य विकासमंत्री तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यानी शनिवारी (ता. तीन) व्यक्त केला. हासोरी (बु., ता. निलंगा) येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत तीन मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील गायकवाड होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, लातूर महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार, अरविंद पाटील निलंगेकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, कृषी सभापती बजरंग जाधव, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, ॲड. संभाजीराव पाटील, जयश्री पाटील, वीज महानिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश चावरे, मुख्य अभियंता नवनाथ शिंदे, महावितरणचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड, सहायक अभियंता इम्रान मुजावर, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे-पाटील, तहसीलदार विक्रम देशमुख, पंचायत समितीचे सभापती अजित माने, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे उपस्थित होते. 

या वेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, की या सौर प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील जवळपास पावणेपाचशे शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. राज्यातील या योजनेतला हा पहिला प्रकल्प असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी खासदार सुनील गायकवाड म्हणाले, की लातूर जिल्ह्यात रेल्वे कारखान्यासारखे मोठे प्रकल्प पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांमुळेच आले आहेत. त्यांनी या भागाला मोठा सौर प्रकल्प मंजूर केला असून, सध्या नऊ हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तुकाराम बीज असल्याने मान्यवरांना गाथा व तुकाराम महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तळपत्या उन्हातही महिलांनी डोक्‍यावर घागरी घेऊन या वेळी पालकमंत्र्यांची मिरवणूक काढली.

पदाधिकाऱ्यांनी भान ठेवावे
या वेळी पालकमंत्री म्हणाले, की अनेक वर्षांच्या संघर्षानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदेत काँग्रेसविरोधी सत्ता आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादामुळे हे शक्‍य झाले असून अनेकांना पदे मिळाली आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात ठेवून ग्रामीण भागातून कामे घेऊन येणाऱ्या नागरिक व कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Web Title: marathi news railway latur marathwada