पंचवीस कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

लातूर - महापालिकेची हलाकीची आर्थिक परिस्थिती, पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या विजेची वाढती थकबाकी, चालू देयकही भरले जात नसल्याने महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित करण्याचे वाढते प्रकार यामुळे लातूरकर त्रस्त झाले आहेत. यावर सर्व कटकटीतून मुक्त होण्यासाठी आता राज्य शासनाने महापालिकेसाठी २५ कोटींचा पाच मेगावॉट ऊर्जा प्रकल्प दिला आहे. याला बुधवारी (ता. १४) मुंबईत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. पाणीपुरवठा योजनाची विजेची थकबाकी ३४ कोटींच्या घरात आहे. दरमहिन्याला ५० लाखांपर्यंत वीज बिल येत आहे. त्यात शहरातील पथदिव्यांची विजेची थकबाकी साडेबारा कोटींच्या घरात आहे. दर महिन्याला २४ लाख रुपये विजेचे बिल येत आहे. दोन-तीन महिन्यांचे बिलच महापालिकेने भरले नसल्याने चार दिवसांपासून शहरातील १५ हजार पथदिवे बंद आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने सोमवारी (ता.१२) ‘लातुरातील पंधरा हजार पथदिव्यांची वीज गुल’ असे वृत्तही प्रकाशित केले होते. त्यानंतर बुधवारी मुंबईत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहराच्या वीज बिलावर बरीच चर्चा झाली. सौर ऊर्जा प्रकल्प हा एकमेव उपाय या प्रश्‍नावर असल्याची चर्चा करण्यात आली. यातून महापालिकेसाठी २५ कोटींचा पाच मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. ‘मेडा’च्या सहाय्याने या संबंधीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना श्री. बावनकुळे यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विजेचा प्रश्‍न मिटण्यास मदत होणार आहे.

ऊर्जामंत्र्यांसोबत शहराच्या वीज बिलासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. यात मार्चअखेरपर्यंत चालू थकबाकी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही थकबाकी तातडीने भरली जाईल. शहरातील पथदिवे उद्या सुरू होतील. 
-सुरेश पवार, महापौर

पाणीपुरवठा व पथदिव्यांसंदर्भात सौर ऊर्जा प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. ‘मेडा’च्या सहाय्याने लवकरच प्रस्ताव पाठविला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगातून थकबाकी भरण्यावर चर्चा झाली. हा प्रस्तावही पाठविला जाणार आहे. चालू बिल वेळेवर भरले तर वीज तोडली जाणार नाही यावरही चर्चा झाली.
- कौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त

Web Title: marathi news Solar Power Project aurangabad news