मराठवाड्यात व्हावे पर्यटनाचे क्‍लस्टर 

अभिजित हिरप 
सोमवार, 16 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

मराठवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी. त्यामुळे औरंगाबादसह आठही जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटनाच्या परीघ क्षेत्रातदेखील आलेली दिसत नाहीत. विभागात पर्यटनाचे क्‍लस्टर विकसित होण्याची गरज आहे. 

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा समावेश आहे. या आठ जिल्ह्यांत शंभराच्या आसपास पर्यटनस्थळे आहेत. 
"युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लाभलेल्या अजिंठा आणि वेरूळ या दोन लेणींचा अग्रक्रम लागतो. वर्षाकाठी स्थानिक आणि परदेशी मिळून दहा लाखांहून अधिक पर्यटक या लेणींना भेटी देतात. त्यापाठोपाठ औरंगाबादचा बिबी-का-मकबरा, दौलताबाद किल्ला आणि नांदेडचा सचखंड हजूरसाहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

याव्यतिरिक्‍त मराठवाड्यात घृष्णेश्‍वर मंदिर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, औरंगजेबची कबर, बिबी-का-मकबरा, पाणचक्‍की, मलिक अंबरची कबर, ऐतिहासिक 52 दरवाजे, कंधारचा भुईकोट किल्ला, माहूरगड, अंबाजोगाईच्या शिवलेणी, सौताडा धबधबा, कपिलधार धबधबा, मुकुंदराज समाधी परिसर, धारूरचा किल्ला, बिंदुसरा उद्यान, तुळजाभवानी मंदिर, नळदुर्ग किल्ला, हजरत तराबुल हक दर्गा आणि नेमगिरी (ता. जिंतूर) येथील लेणी आदी पर्यटनस्थळांचाही समावेश आहे. पुरेशी वाहतूक सुविधा, रस्ते आणि मार्केटिंग नसल्याने ही स्थळे स्थानिक स्वरूपाच्या पर्यटनासाठीच अधिक प्रसिद्ध आहेत. 

पर्यटन संचालनालयाची केवळ घोषणा 
मराठवाड्याचे पर्यटन विकसित होण्याच्या दृष्टीने औरंगाबादमध्ये पर्यटन संचालनालयाचे मुख्यालय व्हावे, ही शहरातील व्यापारी, उद्योजक, पर्यटनक्षेत्रातील उद्योजक आणि नागरिकांची मागणी होती. मंत्रालयाच्या बैठकीत ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये पर्यटन संचालनालयाचे कार्यालय औरंगाबादमध्ये सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, निधीअभावी हे काम रखडल्याची शक्‍यता सूत्रांकडून व्यक्‍त होत आहे. औरंगाबादमध्ये विभागीय पर्यटन संचालनालय कार्यालय सुरू करण्यामध्ये प्रामुख्याने तीन मोठे अडथळे आहेत. यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, महापालिका असताना संचालनालयाची आवश्‍यकता आहे की नाही आणि संचालनालयामुळे कार्यक्रम घेण्यात "परवानाराज' आल्यास अडथळेच अधिक निर्माण होण्याची शक्‍यता असून, यामुळे पर्यटन संचालनालयाचे कार्यालय सुरू करण्यात चालढकल होत असल्याचेही पर्यटन मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

कामांचे मॉनिटरिंगच नाही 
अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पर्यटन मंत्रालयाचा "सर्किट डेव्हलपमेंट फॉर औरंगाबाद' प्रकल्प डिसेंबर 2014 मध्ये मंजूर झाला. याअंतर्गत बिबी-का-मकबरा, पाणचक्‍की, नगारखाना गेट, टुरिस्ट टॅक्‍सी स्टॅंड, रस्त्यांचे सुशोभीकरण, रोझ गार्डन, दौलताबाद किल्ला, अजिंठा व्ह्यू पॉईंट, बनी बेगम बाग आणि आणि देवगड घाट येथे 23 कोटी 43 लाख रुपयांची विविध कामे मंजूर करण्यात आली. "एमटीडीसी'मार्फत ही कामे होत असली, तरीही या कामांकडे लक्ष देण्याची व्यवस्थाच उपलब्ध नाही. त्यामुळे कुठे सुरू, तर कुठे बंद अशी या कामांची स्थिती आहे. 

"ट्रान्झिट टुरिस्ट' येतात अन्‌ जातात 
शहरात उद्योग, व्यापार, वैद्यकीय, शिक्षणक्षेत्राशी संबंधित अनेक परिषदा व कार्यशाळा होत असतात. त्यानिमित्त देश-विदेशांतून लाखो पर्यटक शहरातून ये-जा करीत असतात. त्यांना पूरक असलेल्या कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ट्रान्झिट स्वरूपातील सुमारे दोन लाख पर्यटक वर्षाकाठी थेट परतीचा प्रवास गाठतात. त्यांच्याकडे पर्यटक म्हणून पाहण्याची आवश्‍यकता आहे. त्यांच्यासाठी सायंकाळनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन होणे गरजेचे आहे. केवळ उद्योगासाठी शहरात दरवर्षी 50 हजार पर्यटक येतात. मात्र, त्यांच्यासाठी सायंकाळी विरंगुळ्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. ते झाल्यास स्थानिक टॅक्‍सी व्यवसाय, हस्तकला, हॉटेल-रेस्टॉरंट आणि पारंपरिक बाजारपेठांना बळकटी येईल. 

मीटिंग्ज, इन्सेंटिव्हज, कॉन्फरन्सेस अँड एक्‍झिबिशन (माईस) 
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि भविष्यातील स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पर्यटनाव्यतिरिक्‍त कॉर्पोरेट बैठका, परिषदा आणि प्रदर्शनाला वाव आहे. उद्योग-व्यवसायासाठी येताना हे पर्यटक आपल्या कुटुंबीयांनाही सोबत आणतात. त्यासाठी खासगी उद्योजकांच्या मदतीने कन्व्हेन्शन सेंटर, कॉन्फरन्स अँड बॅन्क्‍वेट हॉल, ऑडिटोरिअम, स्टेडियम, क्‍लब हाऊसेस, गोल्फ कोर्स, योगा आणि आयुर्वेदिक उपचार केंद्र, टेनिस-बॅडमिंटन कोर्ट आणि स्पा सुविधेसह हेल्थ क्‍लब उभारता येणे शक्‍य आहे. इंडियन कन्व्हेन्शन प्रमोशन ब्यूरोशी या सेवा संलग्न केल्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटक आकर्षित करता येणे शक्‍य आहे. 

पर्यटन क्‍लस्टर शक्‍य 
पर्यटनात ट्रॅव्हलिंग, हॉटेल-रेस्टॉरंट-लॉजिंग, गाईड आणि पारंपरिक बाजारपेठांचा समावेश होतो. मराठवाड्यातील पर्यटनस्थळांना दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. त्यामुळे हा उद्योग कोट्यवधींचा असला तरीही असंघटितच आहे. हा उद्योग संघटित झाल्यास एकमेकांच्या सहकार्याने पर्यटन क्‍लस्टर उभारण्याबाबत चाचपणी होऊ शकेल. या क्‍लस्टरच्या माध्यमातून पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करणेही सोयीचे होईल. 

ऑनलाइन पोर्टल अत्यावश्‍यक 
मराठवाड्यात हिमरू शाल, पैठणी साड्या, बिदरी आणि हस्तकलेला जगभरातून मागणी असते. ही कला जगभरात पोचण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र ऑनलाइन विक्रीचे पोर्टल लॉजिस्टिक सुविधेसह हवे. त्यामुळे प्रत्यक्ष न येतादेखील या वस्तू जगभरात कुठेही खरेदी करता येतील. ही कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल. त्याचबरोबर जागतिक ई-कॉमर्सच्या स्पर्धेलाही स्थानिक हस्तकला कारागीर टक्‍कर देऊ शकतील. 

गाईडची संख्या तोकडी 
मराठवाड्यात गाईडची एकूण संख्या 64 च्या घरात आहे. मात्र, हंगामामध्ये हे गाईड व्यवसाय मिळेल तेथे जातात. त्यामुळे पर्यटकांना माहिती देण्याचे काम रिक्षावाले, चौकीदार आणि शिपाई करतात. त्यामुळे गाईडची संख्या वाढविण्याबरोबर पर्यटकांचीही संख्या वाढल्यास हा व्यवसाय बारमाही होऊ शकेल. याकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 

प्रचाराचा अभाव ठरतोय पर्यटनातील अडसर 
औरंगाबादमध्ये पर्यटकांची संख्या तुलनेत वाढताना दिसत नाही. त्याउलट परदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यासाठी नियोजनबद्ध नसलेला प्रचार-प्रसार प्रामुख्याने जबाबदार आहे. सध्या टाईम्स स्क्‍वेअरला दिवाळी फेस्टिव्हल, बर्लिन इंटरनॅशनल टुरिझम एक्‍झिबिशन, पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन, ट्रॅव्हल मार्ट, पर्यटन मंत्रालयाचा रोड शो, साऊथ एशिया ट्रॅव्हल अँड टुरिझम इव्हेंट, वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटसह विविध प्रदर्शनांमध्ये राज्य आणि देशातील पर्यटनस्थळांचा प्रचार-प्रसार केला जातो. मात्र, यामध्ये औरंगाबादवरच ठळकपणाने भर देऊन काही होत नसल्याने त्यासाठी ठोस धोरण आखण्याची आवश्‍यकता आहे. 

कनेक्‍टिव्हिटी आणि मार्केटिंग हा पर्यटनाचा आत्मा आहे. त्याव्यतिरिक्‍त पर्यटन कॉनक्‍लेव्हमध्ये सातत्याने घडामोडी आवश्‍यक आहेत. विमानतळाचा हवा तसा फायदा घेतला जात नाही. जास्तीत जास्त विमाने येण्यासाठी चर्चा व्हावी. बॉलिवूड टुरिझमसाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यातून रोजगार मिळेल. मुंबई-औरंगाबाद अंतर चाळीस मिनिटात कापले जाते. त्यामुळे ते सर्वांच्याच सोयीचे आहे. 
- जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड असोसिएशन 

पर्यटनाचा विकास होण्यासाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. लोणार, परभणी, लातूरसारख्या ठिकाणी जोडणारे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. वॉशरूम, रेस्टॉरंट हवे. डस्टबिन हव्यात. वाहतूक व्यवस्था सोयीस्कर हवी. बस, कार जर पर्यटकांना सर्वत्र हवी असेल तर ती सुविधा मराठवाड्यात उपलब्ध नाही. केंद्र अथवा राज्य सरकारही हे काम करू शकते. 
- दुलारी कुरेशी, इतिहासतज्ज्ञ 

सरकारच्या बरोबरीत सर्वसामान्य नागरिकांनीही पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करायला हवेत. अजिंठा-वेरूळ महोत्सव सातत्याने होण्यास पोषक वातावरण असण्याची जबाबदारी आपलीच आहे. दरवर्षी घेण्याची कल्पना शासनात निर्माण व्हावी. याच्या तारखा एक वर्षापूर्वीच घोषित झाल्या पाहिजेत. त्यामुळे जगभरात महोत्सवाचे मार्केटिंग करता येईल. 
- मानसिंग पवार, उद्योजक. 
 

पर्यटनासंबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी पर्यटन पदवी घेतलेले असल्यास त्यांना पर्यटनाचे विपणन, विकास, नियोजन याची माहिती असते. पर्यटनतज्ज्ञ चांगल्याप्रकारे पर्यटनाचे नियोजन करू शकतो. पर्यटकांना चांगली सेवा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थळाचे नाव होऊ शकते. यासंदर्भात 1999 मध्ये केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना निवेदन दिले होते. पदे मंजूर होतात पण कोणताही पदवीधर त्या ठिकाणी निवडला जातो, हे दुर्दैव. 

- डॉ. राजेश रगडे, विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. 

मराठवाड्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. परभणीत हजरत दर्गा, नांदेडचा गुरुद्वारा, पाथरीचे साई मंदिर, उस्मानाबाद, नळदुर्ग, तुळजापूर आदी सर्व क्षेत्रांचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग व्हावे. सरकारने पुरवलेले ऑनलाईन प्लॅटफॉन युजर फ्रेंडली नाहीत, तसेच ऑनलाईन टूर प्लॅनरसुद्धा अस्तित्वात नाहीत. टुरिझम फॉर ऑल संकल्पना सत्यात उतरायला हवी. 
- प्रा. डॉ. माधुरी सावंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 
 

आपली कनेक्‍टिव्हिटी वाढण्याबाबत चर्चा होते. मात्र, त्यावर कृती होत नाही. त्यावर प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यानंतर पर्यटनवाढीसाठी मार्केटिंग प्रयत्न केले जायला पाहिजेत. अद्यापही परदेशातील पर्यटकांना युनेस्कोच्या यादीतील अजिंठा आणि वेरूळ लेणींची माहिती नाही. आपल्या भागाचा प्रचार होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. 
- सुभाष जाधव, उपाध्यक्ष, टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडिया. 
 

ऐतिहासिक वारसा स्थळांच्या समोर आम्ही शंभराच्या वर फिरते व्यापारी हातावर सामान, वस्तू घेऊन त्याची विक्री करत असतो; परंतु आम्हाला अधिकृत परवाने नसल्याने पर्यटकांना अडचणी येतात. प्रशासनाने आम्हाला अधिकृत परवाने व ओळखपत्र दिल्यास आमची व पर्यटकांची दोघांची विश्वासार्हता वाढेल. विक्रेत्यांसाठीही नियमितपणे कार्यशाळा घेऊन पर्यटकांसोबत कसे वागावे याची माहिती द्यावी. त्यामुळे सुसंवाद वाढू शकेल. 
- शेख फरीद बाबा, अध्यक्ष, हॉकर्स युनियन 

ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे परंतु विभागामार्फत त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण पर्यटक येथे आल्यावर साडेसातशे पायऱ्या चढून वर जाण्यास कंटाळा करतात त्यांना किल्ल्याच्या परिसरात पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास पर्यटक जास्त काळ थांबले तर व्यावसायिकांना फायदा होईल. 
- दिगंबर चिनुके, हॉटेल व्यावसायिक, दौलताबाद. 

Web Title: Marathwada be tourism cluster