आत्महत्याग्रस्त ९८ टक्‍के कुटुंबांत एकालाही नाही नोकरी

आत्महत्याग्रस्त ९८ टक्‍के कुटुंबांत एकालाही नाही नोकरी

अंबाजोगाई - तालुक्‍यात मागील तीन वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ९८ टक्‍के कुटुंबातील एकाही सदस्याला शासकीय नोकरी नाही, असा निष्कर्ष योगेश्‍वरी शिक्षण संस्था व छात्रसेनेच्या छात्रांनी केलेल्या सर्वेक्षणात निघाला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील दहा टक्‍के मुलांनी परिस्थितीमुळे शिक्षण सोडले आहे, असे धक्‍कादायक चित्र पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.    

येथील योगेश्‍वरी शिक्षण संस्था, छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्यात तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा त्यांच्या प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन सर्वेक्षण केले. तालुक्‍यातील ४८ गावांत ८४ कुटुंबांना त्यांनी भेटी देऊन त्यांची सद्यःपरिस्थितीही जाणून घेतली. योगेश्‍वरी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणासाठी संस्थेचे पदाधिकारी प्रा. एस. के. जोगदंड यांच्यासह प्रा. अजय चौधरी, प्रा. डॉ. प्रवीण भोसले, प्रा. यशवंत हंडिबाग, प्रा. अरुण नरसिंगे, प्रा. एस. जी. वडज, प्रा. गंगाधर अकलोड, छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

या पाहणीत सिद्ध झाल्यानुसार २० ते ४० वयोगटात ४२ टक्‍के आत्महत्या झाल्या. म्हणजे आत्महत्या करण्यात युवकांचे प्रमाण मोठे आहे. यात जवळपास ९२ टक्‍के आत्महत्या कर्जामुळेच झाल्या असून ५० हजार रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या २५ ते २६ टक्‍के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वांत जास्त साडेचार ते पाच लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण फक्‍त एक टक्‍का आहे. कोणतेही कर्ज नसताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण साडेसात टक्‍के आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी ४५ टक्‍के शेतकऱ्यांनी नापिकी, कर्ज, सावकाराचा तगादा यातून नैराश्‍य आल्याने आत्महत्या केल्या. मुलीच्या लग्नाचा खर्च कसा फेडायचा या विवंचनेतून ४० टक्‍के शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.   

सर्वेक्षणाचा हेतू
युवा पिढीमध्यें समाजभान निर्माण व्हावे, युवकांना शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न व शेतकऱ्यांचा आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक व शैक्षणिक पातळीवरील नेमकेपणा कसा असतो याची जा    णीव व्हावी, या हेतूने हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘अंबाजोगाई तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या एक चिंतन’ असा या पाहणी दौऱ्याचा विषय होता. त्याअंतर्गत ज्या गावात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत, अशा गावात प्रत्यक्ष कुटुंबाच्या भेटी घेऊन प्रश्‍नावली भरून घेतली. या प्रश्‍नावलीत मिळालेल्या उत्तरानुसार वयोगटानुसार निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

४८ गावांत ८४ आत्महत्या
मागील (२०१४-१७) तीन वर्षांत तालुक्‍यात ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात शासनदरबारी नोंद असलेल्या वा शासकीय मदतीस ५४ टक्‍के पात्र ठरले, ३० टक्‍के अपात्र, तर दहा टक्‍के आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नोंदच नाही. २०१५ या वर्षात तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. याच वर्षात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त (३१) आहे. तालुक्‍यातील ४८ गावांत ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 

अत्यल्पभूधारकाचे प्रमाण सर्वांत जास्त 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ३३ टक्‍के आहे. अल्पभूधारकाचे प्रमाण १४ टक्‍के, तर पाच एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण ८.५० टक्‍के आहे. यातील पावणेतेरा टक्‍के शेतकऱ्यांकडे शासकीय बॅंका, सव्वापाच टक्‍के जणांकडे खासगी बॅंका, ११.५ टक्‍के शेतकऱ्यांकडे सावकार व हातउसने कर्ज, २१.२५ शेतकऱ्यांकडे शासकीय व खासगी बॅंकांचे कर्ज आणि ९.३५ टक्‍के शेतकऱ्यांकडे शासकीय, खासगी व सावकारी कर्ज असल्याचे या अहवालातून निष्पन्न झाले. घेतलेले कर्ज फिटत नाही. त्यामुळे बॅंकेची नोटीस, जप्ती होईल व त्यातून अचानक बदनामी होईल व आपली प्रतिष्ठा जाईल या विवंचनेतून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 

कुटुंबांना सध्याच्या अडचणी
घरातला कर्ता गेल्याने शेतकऱ्यांच्या या कुटुंबांना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने या कुटुंबांना दारिद्य्ररेषेत समाविष्ट करून त्यांना बीपीएलधारक करणे गरजेचे आहे. या कुटुंबांना आपल्या मुलांचे शिक्षण कसे करायचे हा प्रश्‍न आहे. मुलींच्या लग्नाचा प्रश्‍न आहे. कुटुंबात कोणी आजारी पडले तर त्याच्या आजाराचा खर्च करण्यासाठी आर्थिक अडचण भासते. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कुटुंबांच्या प्रत्यक्ष भेटीत या अडचणी समोर आल्याचे प्रा. एस. पी. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. या समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय शोधण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया योगेश्‍वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी व्यक्‍त केली.  

शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असे चित्र आहे. अत्यंत कमी वयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब अनेक अडचणींना तोंड देत आहेत. शेतीपेक्षा मजुरी केलेली परवडली अशा शेतकऱ्यांच्या भावना झाल्या आहेत. या सर्व कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना बिपीएलचे कार्ड देणे गरजेचे आहे. या कुटुंबापैकी काही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा योगेश्‍वरी शिक्षण संस्थेचा मानस आहे.
-प्रा. माणिकराव लोमटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com