खडकपुर्णाच्याच पाण्यासाठी अट्टाहास कश्यासाठी? : भारत बोंद्रे

Marathwada had water resources, why demand for Khadakpurna dam water : Bharat Bondre
Marathwada had water resources, why demand for Khadakpurna dam water : Bharat Bondre

चिखली : मराठवाड्यातील जालना, मंठा आणि परतुर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी नेण्याचा घाट मराठवाड्यातील काही राजकीय नेत्यांनी घातलेला आहे. मराठवाड्यामध्ये या शहरापासुन हाकेच्या अंतरावर आणि खडणकपुर्णा पेक्षा दुप्पट पाणी क्षमता असलेल्या लोअर दुधना प्रकल्पातून पाणी घेण्याएैवजी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी मराठवाड्यामध्ये नेण्याचा घाट का घातला जातो आहे असा सवाल राज्याचे माजी उद्योगमंत्री भारत बोंद्रे यांनी पत्रकार परीषदेमध्ये उपस्थित केला आहे.

रविवारी (ता.2) स्थानिक विश्रामगृहावर पार पडलेल्या पत्रकार परीषदेला माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, शंतनू बोंद्रे, संजय गाडेकर, गजानन वायाळ, शंतनू पाटील, डॉ.प्रकाश शिंगणे, राजीव जावळे, राजु पाटील, राम खेडेकर, सुधीर पडघान आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना भारत बोंद्रे यांनी खडकपुर्णा प्रकल्पाची क्षमता केवळ 160 दलघमी आहे आणि त्यापैकी जवळपास 35 ते 40 दलघमी पाणी हे बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेरा बुद्रुक, देऊळगाव मही या जिल्ह्यातील गावांसह मराठवाड्यातील भोकरदन आणि सिल्लोडसाठी यापुर्वीच आरक्षित केलेले आहे. मग आता पुन्हा या प्रकल्पातून मराठवाड्यातील शहरांना पिण्यासाठी पाणी देऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर आणि नागरीकांवर अन्याय करण्याची भुमिका सरकारमध्ये असलेले पदाधिकारी कशी घेऊ शकतात. जालना, मंठा आणि परतुर या शहरांच्या अगदी जवळ असलेल्या लोअर दुधना या 345 दलघमी क्षमता असलेल्या (म्हणजेच खडकपुर्णा प्रकल्पाच्या जवळपास दुप्पट) प्रकल्पातून पाणी पिण्यासाठी घेणे सोईचे असतांना आपल्याकडील पाणी राखुन ठेवावयाचे आणि बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पळवायचे अशी भुमिका मराठवाड्यातील नेत्यांनी घेतलेली दिसते आहे. हा जलस्त्रोत उपलब्ध नसता तर एखादवेळी पिण्यासाठी पाणी देणे अपरीहार्य ठरले असते मात्र जवळच जलस्त्रोत असतांना आणि भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या सोईचे नसतांना केवळ बुलडाणा जिल्ह्याचा द्वेषभावनेतूनच हा पाणी पळविण्याचा घाट घातलेला दिसतो आहे असा आरोपही बोंद्रे यांनी यावेळी केला. आज या खडकपुर्णा प्रकल्पामध्ये शुन्य टक्के पाणीसाठा झालेला आहे, त्यामुळे आहेत त्या पाणीपुरवठा योजनांना देखिल पुरेसे पाणी मिळू शकणार नाही मग आणखी पिण्याचे पाण्याच्या नावाखाली शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील पाणी पळविणे कोणत्या संकेतामध्ये बसते. 

दुसरीकडे हा खडकपुर्णा प्रकल्प होऊच नये यासाठी मराठवाड्यातील तत्कालीन नेत्यांनी जंगजंग पछाडित अगदी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करुन या प्रकल्पाला विरोध केला होता. मग आता मानविय दृष्टीकोनातून का होईना मराठवाड्यासाठी पाणी कसे देणार. जलसंपदा विभागाच्या नियमानुसार कोणत्याही प्रकल्पामधून 25 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी पाणीपुरवठा योजनांसाठी आरक्षित करता येत नाही, मात्र राज्य सरकार नियमांना आणि संकेतांना मुरड घालून या मागणीवर विचार करु शकते, मात्र जिल्ह्यातील नागरीक आणि शेतकर्‍यांच्या भवितव्याचा विचार करुन राज्य सरकारने खडकपुर्णा प्रकल्पाएैवजी लोअर दुधना प्रकल्पामधुनच जालना, मंठा आणि परतुर शहरांच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षण द्यावे. यावेळी बोलतांना अ‍ॅड. नाझेर काझी यांनी आजच पाणीपुरवठ्याच्या जलस्त्रोतांमध्ये पाणी नसल्याने सिंदखेडराजा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मृत साठ्यामधुन चारी खोदुन शहराला पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील नागरीकांची पाण्यासाठी वणवण होत असतांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी आणि नागरीकांची घरे या प्रकल्पामध्ये गेलेली असतांना प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात नेऊच देणार नाही असा ईशारा दिला. सोबतच याप्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल असा ईशारा शंतनू बोंद्रे यांनी दिला. 

जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींना आजवर ही समस्या कळलीच नाही.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी आणि नागरीकांची घरे या खडकपुर्णा प्रकल्पामध्ये गेलीत, या प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे पाणी मराठवाड्यातील नेते संगनमताने पळविण्याचा घाट घालत असतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींकडून आजवर विरोधाचा चकार शब्दही उच्चारला गेला नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त करुन जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरीकांच्या समस्यांबाबत लोकप्रतिनीधींना आज प्रशिक्षणाची गरज असल्याचेही मत या पत्रकार परीषदेत मांडण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com