व्यापारी संकुलाचे भिजते घोंगडे!

व्यापारी संकुलाचे भिजते घोंगडे!

अहमदपूर - शहरात नगरपालिकेच्या मोक्‍याच्या ठिकाणी अनेक मोकळ्या जागा आहेत. या ठिकाणी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून, काही जागेवरील प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे घोंगडे भिजत पडले आहे. पर्यायाने शहरातील व्यापारी दुकानांच्या किरायात भरमसाट वाढ झाली आहे. 

शहरात व्यापारी संकुल असावे ही अनेक वर्षांपासूनची संकल्पना विविध कारणांमुळे अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यामुळे विविध व्यावसायिकांना वर्षाला एक लाख ते दीड लाख रुपये एवढा किराया जागामालकांना द्यावा लागतो. त्यामुळे शहरात त्वरेने व्यापारी संकुल होणे गरजेचे आहे. 

सध्या नगरपालिका आहे तेथे तहसील कार्यालयासमोर, चारटांगीचा भाग, डॉ. गिरबिडे यांच्या दवाखान्यासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, हनुमान मंदिरासमोर; तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे पालिकेची जागा आहेत. या ठिकाणी व्यापारी संकुल होऊन, नगरपालिकेला उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होऊ शकतो. शिवाय व्यावसायिकांचीही मोठ्या प्रमाणात सोय होऊ शकणार आहे.  नगरपालिका इमारत परिसरात मोकळी जागा आहे. या जागेवर बागेचे आरक्षण होते, ते रद्द करून त्या ठिकाणी व्यापारासाठी आरक्षण करण्यात आले आहे. या जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्ववर व्यापारी संकुल बांधण्याचे नगरपालिकेचे नियोजन असून या प्रस्तावास नगरविकास खात्याची मंजुरी मिळताच कामास सुरवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिकाम्या जागेत व्यापारी संकुलाची दोन मजली इमारत बांधण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. या ठिकाणी सुलभ शौचालयाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सर्वच कामांची निविदा काढण्यात आली असून, यास कार्यमंजुरीही मिळाली आहे; परंतु येथील प्रस्ताव न्यायप्रविष्ट आहे. 

चारटांगी येथे एकात्मिक शहर योजनेंतर्गत नगरविकास खात्याच्या वतीने १०० ते १२० गाळ्यांचे व्यापारी संकुल प्रस्तावित आहे. सध्या येथील व्यावसायिकांचा त्यांनाच ते गाळे मिळावेत, असा आग्रह आहे. यासाठी जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी लागणार आहे; परंतु नगरपालिकेकडे एवढा निधी नसल्यामुळे अतिरिक्त निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, तो मंजूर होताच या ठिकाणी कामाला सुरवात होणार आहे. तहसीलसमोर असलेल्या जागेबाबत नगररचनाकारांनी जाचक अटी टाकल्या असल्याने तेथील व्यापारी संकुलाचे काम रखडले आहे.  

डॉ. गिरबिडे यांच्या दवाखान्यासमोर लोखंडी अँगलच्या साहाय्याने तात्पुरते गाळे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु तेथीलही कामाबाबत वाद निर्माण झाल्याने, हेही काम न्यायप्रविष्ट आहे. हनुमान मंदिराच्या समोरील जागेत; तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या मागील जागेत व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. येथील जागेचे प्रकरणही न्यायप्रविष्ट असल्याने व्यापारी संकुलाचा प्रश्‍न लांबणीवर पडला आहे. एकूणच या परिस्थितीत व्यापारी संकुलाचा प्रश्‍न कधी आणि कसा मार्गी लागणार हा मोठा आहे.

शहरात व्यापारी संकुल व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, लवकरच या प्रयत्नांना यश येऊन व्यापारी संकुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. 
- अश्विनी कासनाळे, नगराध्यक्षा

शहरातील दुकानांचा किराया मोठ्या प्रमाणात वाढल्याने, नफ्याचा बहुतांश भाग यातच जातो. त्यामुळे व्यापारी संकुल त्वरेने होऊन, त्याचे पारदर्शीपणे वाटप करण्यात यावे.
- जयनारायण सोनी, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com